
बेळगाव : राज्यातील बीपीएल धारकांना “इंदिरा आहार किट”चे वाटप करण्याचा कर्नाटक राज्य सरकारचा प्रस्ताव आहे. सध्या दरमहा केंद्र सरकारकडून पाच किलो व राज्य सरकारकडून पाच किलो असे प्रत्येकी दहा किलो तांदूळ वाटप करण्यात येत आहे परंतु बीपीएल धारकांना वाटप करण्यात येणारा तांदूळ हा आवश्यकतेपेक्षा जास्त पुरवठा होत असल्याने तांदळाचा काळाबाजार वाढला आहे. काळ्याबाजारावर अंकुश बसवण्यासाठी पर्याय म्हणून राज्य सरकारने “इंदिरा आहार किट” देण्याचा निर्णय घेतला आहे. या किटमध्ये प्रति शिधा धारकाला एक किलो साखर, एक किलो मीठ, एक किलो तूरडाळ, एक लिटर खाद्यतेल, 100 ग्रॅम चहा पावडर, 50 ग्रॅम कॉफी पावडर, दोन किलो गहू इत्यादी पदार्थांचा या “इंदिरा आहार किट” मध्ये समावेश असणार आहे. तांदळाचा काळाबाजार रोखण्यासाठी पर्याय म्हणून किट देण्याचा विचार सुरू आहे, असे अन्न व नागरी पुरवठा मंत्री के. एच. मुनियाप्पा यांनी सांगितले. सुरुवातीला काही निवडक जिल्ह्यात “इंदिरा आहार किट” योजना राबविण्यात येणार आहे. आधार लिंक असलेल्या सर्व बीपीएल शिधापत्रिकाधारकांना रेशन दुकानद्वारे या किट्रसचे वितरण करण्याचा विचार सुरू आहे. “इंदिरा आणि अन्नभाग्य” योजनेचा ब्रँड करण्यात येणार आहे. प्रारंभी योजना प्रायोगिकरित्या लागू करण्यात येणार असून त्यानंतर योजनेचे मूल्यमापन करून संपूर्ण राज्यात या योजनेचा विस्तार करण्यात येणार आहे.
Belgaum Varta Belgaum Varta