
मुख्यमंत्री सिध्दरामय्या; शिवकुमारसोबत घडविले एकीचे प्रदर्शन
बंगळूर : राज्यातील काँग्रेस सरकार पाच वर्षे दगडासारखे मजबूत राहील, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आज म्हैसूर येथे ठासून सांगितले. शेजारी असलेल्या उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचा हात आपल्या हातात घेऊन त्यांनी उंच केला आणि म्हैसूर विमानतळावर एकीचे प्रदर्शन केले.
पत्रकारांशी बोलताना त्यांनी राज्यातील काँग्रेस सरकार लवकरच पडेल आणि विधानसभेसाठी मध्यावधी निवडणुका होतील या भाजप नेत्यांच्या विधानाचा त्यांनी खरपूस समाचार घेतला आणि हे सरकार पाच वर्षे मजबूत स्थितीत राहील असे सांगितले.
मी आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार एक आहोत, एक राहू. कोणी काहीही म्हटले तरी आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. तथापि, भाजप आपल्यात असंतोष असल्याचा खोटा प्रचार करत आहे, कोणी काहीही म्हटले तरी मी आणि शिवकुमार एक आहोत, असे ते म्हणाले.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यावेळी दसऱ्याचे उद्घाटन करणार नाहीत, या विरोधी पक्षनेते आर. अशोक यांच्या विधानावरही त्यांनी प्रत्युत्तर दिले आणि म्हटले की भाजप खोटे बोलण्यात पटाईत आहे. त्यांनी माध्यमांनाच प्रश्न केला की, तुम्हीच सांगा मी दसऱ्याचे उद्घाटन करेन कि नाही. मीच दसऱ्याचे उद्घाटन करणार, याबाबत शंका बळगू नका, असे ते म्हणाले.
भारतीय जनता पक्ष राज्य सरकारविरुद्ध खोटारडेपणा करून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेस सरकार लवकरच पडेल असे म्हणणाऱ्या माजी मंत्री श्रीरामुलु यांच्यावरही त्यांनी टीका केली. ते म्हणाले, “श्रीरामुलु किती निवडणुका हरले आहेत हे तुम्हाला माहिती आहे. ते विधानसभा आणि लोकसभा दोन्ही निवडणुकांमध्ये हरले आहेत. असा माणूस सरकारचा अंदाज कसा लावू शकतो?”
सुरजेवालांचे संघटनेसाठी काम
प्रदेश काँग्रेस प्रभारी आणि एआयसीसी सरचिटणीस सुरजेवाला आज बंगळुरमध्ये आमदारांचे अभिप्राय गोळ करीत आहेत. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, “सुरजेवाला हे एआयसीसी सरचिटणीस आहेत. ते संघटनेचे काम करत आहेत. म्हणूनच त्यांनी आमदारांसोबत बैठक घेतली. ते त्यांचे काम करतील,” असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले.
काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार आर. व्ही. देशपांडे म्हणाले की, सिद्धरामय्या मुख्यमंत्री म्हणून पाच वर्षे पूर्ण करतील. आज बंगळुरमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमधील मतभेदाचे वृत्त फेटाळून लावले आणि मुख्यमंत्री म्हणून सिद्धरामय्या पाच वर्षे पूर्ण करतील असे सांगितले.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना बदलण्यासाठी पक्षात कोणतीही चर्चा झालेली नाही. कोणीही त्याबद्दल बोललेही नाही. आम्ही सर्वजण एकजुटीने काम करत आहोत, असे देशपांडे म्हणाले.

Belgaum Varta Belgaum Varta