
बंगळुरू : विद्यमान मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याऐवजी डीके शिवकुमार यांना मुख्यमंत्री बनवले जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. याच चर्चांना खुद्द मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पूर्णविराम लावला. आपणच ५ वर्षे मुख्यमंत्री राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बुधवारी पुन्हा एकदा राज्यातील नेतृत्व बदलाच्या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. तेच पूर्ण पाच वर्षे मुख्यमंत्री म्हणून राहतील, असे त्यांनी ठामपणे सांगितले. माध्यम प्रतिनिधींशी बोलताना सिद्धरामय्या म्हणाले, ‘हो, मी पाच वर्षे मुख्यमंत्री राहीन, तुम्हाला काही शंका आहे का?’ त्यांच्या या विधानानंतर कर्नाटक काँग्रेसमधील मतभेद पुन्हा एकदा समोर आलेत. त्यामुळे कर्नाटकमधील सत्तासंघर्ष मिटला की, चिघळणार हे पाहणे औत्सुक्यांचे ठरणार आहे.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या दाव्यानंतर उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार म्हणाले, ‘माझ्याकडे काही पर्याय नाही. मला त्यांच्यासोबत उभे राहावे लागेल, मला त्यांना पाठिंबा द्यावा लागेल.’ हायकमांड जे म्हणतील, ‘मला ते करावेच लागेल.’ कर्नाटकातील दोन्ही वरिष्ठ नेत्यांची विधाने, अशावेळी आली आहेत, जेव्हा पक्षाच्या आमदारांनी काही दिवसांपासून शिवकुमार यांना मुख्यमंत्री बनवा मागणी केली होती.
सिद्धरामय्या यांचे हे विधान राज्य सरकारमधील संभाव्य नेतृत्व बदलाबद्दल सुरू असलेल्या राजकीय चर्चेवर पडदा टाकणारे आहे. कारण भारतीय जनता पक्ष आणि जेडीएसने काँग्रेसमध्ये अंतर्गत मतभेद असल्याचा दावा केला होता.

Belgaum Varta Belgaum Varta