
बंगळूर : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरुद्ध भाजपने लोकप्रतिनिधींच्या विशेष न्यायालयात दाखल केलेल्या फौजदारी मानहानीच्या खटल्याला उच्च न्यायालयाने शुक्रवारी अंतरिम स्थगिती दिली.
२०२३ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपविरुद्ध भ्रष्टाचाराचा आरोप करणाऱ्या दैनिक वर्तमानपत्रांमध्ये जाहिराती दिल्याबद्दल मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरुद्ध फौजदारी मानहानीचा खटला दाखल करण्यात आला होता.
सिद्धरामय्या यांनी त्यांच्याविरुद्धचा मानहानीचा खटला रद्द करण्यासाठी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करणाऱ्या उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस. आर. कृष्णकुमार यांच्या खंडपीठाने आज अंतरिम स्थगिती दिली.
काँग्रेसने राज्यातील आघाडीच्या दैनिकांच्या पहिल्या पानांवर ‘भ्रष्टाचार शुल्क यादी’ नावाची जाहिरात दिली होती, ज्यामध्ये असा आरोप करण्यात आला होता की राज्यात भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेत असताना सरकारने विविध पदांसाठी दर निश्चित केले होते.
या जाहिरातीमुळे पक्षाची प्रतिष्ठा खराब झाल्याचा आरोप करत भाजपने लोकप्रतिनिधींच्या विशेष न्यायालयात फौजदारी मानहानीचा खटला दाखल केला होता. या प्रकरणात मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनाही आरोपी म्हणून नाव देण्यात आले होते.

Belgaum Varta Belgaum Varta