
बेंगळुरू : नांदणी मठातील माधुरी हत्तीचे प्रकरण ताजे असतानाच कर्नाटक राज्यातील अन्य तीन मठामध्ये असलेल्या हत्तींच्या सुटकेसाठी पर्यावरण प्रेमींकडून कर्नाटक उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. शेडबाळ, अलकनूर व रायचूर मठातील हत्तींची मुक्तता करण्यासाठी ही जनहित याचिका दाखल केली आहे. कर्नाटक उच्च न्यायालयात 3 सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे. शेडबाळ येथील श्री शांतीसागर दिगंबर जैन आश्रमातील पद्मा हत्ती, अलकनूर मठातील श्रीकरी सिद्धेश्वर मठातील ध्रुव व रायचूर मठातील मेनका या तीन हत्तींची सुटका करण्यात यावी अशी याचिका पर्यावरण प्रेमी जी. आर. गोविंद यांनी मुंबई उच्च न्यायालयात ही जनहित याचिका दाखल केली होती. मुंबई उच्च न्यायालयाने कार्यक्षेत्राचा मुद्दा उपस्थित करून ही याचिका बेंगलोर उच्च न्यायालयाकडे वर्ग केली आहे. उच्च न्यायालयाने कर्नाटकातील तीनही मठांच्या विश्वस्तांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते त्यानुसार विश्वस्त बेंगलोर येथील उच्च न्यायालयात हजर झाले व त्यांनी आपली बाजू मांडली. या याचिकेची पुढील सुनावणी ३ सप्टेंबर रोजी होणार आहे. नांदणी मठातील माधुरी हत्तीप्रमाणे कर्नाटकातील हत्तींची देखील सुटका होणार का याकडे पर्यावरण प्रेमींचे व कर्नाटकातील जनतेचे लक्ष लागून राहिले आहे. या याचिकेबाबत बोलताना आश्रमाचे अध्यक्ष म्हणाले की, शेडबाळ येथील मठात हत्तीला आवश्यक असलेल्या सर्व सोयी सुविधा आश्रमांकडून पुरविल्या जात आहेत. हत्ती निरोगी व सुरक्षित आहे. आमच्याकडून आवश्यक ती सर्व कागदपत्रे व पुरावे न्यायालयात सादर करण्यात आले आहेत. त्यामुळे हत्तीची सुटका करण्याचा प्रश्न येत नाही असे त्यांनी यावेळी सांगितले.
माधुरी हत्तीसाठी कोल्हापूर जिल्ह्यात ज्याप्रमाणे आंदोलन झाले. त्याप्रमाणे कर्नाटकातील तीनही हत्तींच्या सुटकेसाठी आंदोलन उभारले जाईल का याकडे कर्नाटक राज्यासह संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे.

Belgaum Varta Belgaum Varta