Monday , December 8 2025
Breaking News

गणपती विसर्जन मिरवणुकीत ट्रक घुसला; ९ जणांचा मृत्यू

Spread the love

 

हासन : गणपती विसर्जन मिरवणुकीत भरधाव वेगाने आलेला ट्रक घुसल्यामुळे भीषण अपघात होऊन ९ जणांचा मृत्यू झाल्याची घटना कर्नाटकच्या हासन जिल्ह्यात घडली आहे. गुरूवारी सायंकाळी हा अपघात घडला. त्यानंतर शुक्रवारी आरोपी चालकाला अटक करण्यात आली.

पोलीस महानिरीक्षक बोरलिंगय्या यांनी या घटनेची माहिती देताना सांगितले की, गुरूवारी रात्री ८ ते ८.४५ वाजण्याच्या सुमारास मोसालेहोसल्ली गावात सुरू असलेल्या गणपती विसर्जन मिरवणुकीत एक ट्रक भरधाव वेगाने येऊन घुसला. यामुळे गर्दीतील ९ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर २० हून अधिक जण जखमी आहेत. मृतांमध्ये ६ ग्रामस्थ आणि ३ अभियांत्रिकीचे विद्यार्थी आहेत.

मोसालेहोसल्ली गावातील ग्रामस्थांनी चार पदरी राष्ट्रीय महामार्ग ३७३ च्या एका मार्गिकेवरून मिरवणूक काढली. पोलिसांनी येथे वाहतूक वळवून दुसऱ्या मार्गिकेवरून वाहतूक सुरू ठेवली होती. रात्री ८.३० च्या दरम्यान रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने भरधाव वेगाने जाणारा ट्रक दुभाजक ओलांडून भाविकांच्या गर्दीत घुसला.

या अपघातानंतर जखमींना २० किमी अंतरावर असलेल्या हासन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स आणि इतर खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेनंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दुःख व्यक्त केले असून मृतांच्या नातेवाकांसाठी ५ लाखांची आर्थिक मदत जाहीर करत असल्याचे सांगितले.

सिद्धरामय्या यांनी म्हटले, “हासन येथे गणेश विसर्जन मिरवणुकीत ट्रकच्या धडकेत अनेकांना जीव गमवावा लागला आणि २० हून अधिक जण गंभीर जखमी झाल्याची बातमी एकून दुःख झाले. मृतांच्या आत्म्याला शांती मिळावी आणि जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना करतो. सरकारच्या वतीने मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची भरपाई दिली जाईल. तसेच जखमींचा वैद्यकीय खर्चही सरकार उचलेल.”

माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनीही या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केले. तसेच जेडीएसचे आमदार एचडी रेवण्णा यांनी घटनास्थळाची पाहणी करून मदत कार्याचा आढावा घेतला. त्यांनी पोलिसांवर आरोप करताना म्हटले की, पोलिसांनी दुसऱ्या बाजूने जाणाऱ्या वाहनांचा वेग नियंत्रित करायला हवा होता.

About Belgaum Varta

Check Also

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी होणार पूर्वीप्रमाणे तीन परीक्षा; परीक्षा मंडळाचे स्पष्टीकरण

Spread the love  बंगळूर : कर्नाटक शालेय परीक्षा आणि मूल्यांकन मंडळाने (केएसईएबी) यंदाही दहावी विद्यार्थ्यांसाठी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *