
बेंगळुरू : आपल्याविरोधात संतोष पाटील नामक व्यक्तीने दिल्लीत तक्रार केली आहे. मी कमिशन मागितल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला असून या तक्रारीनुसार केंद्रीय ग्रामविकास मंत्री गिरीराज सिंग यांच्या कार्यालयातून आमच्या कार्यालयात पत्र आले असून यासंदर्भात त्यांनी स्पष्टीकरण मागितले आहे. यानुसार अतिरिक्त मुख्यसचिव अतिक यांनी स्पष्टीकरण दिले आहे, अशी माहिती ग्रामविकास मंत्री के. ईश्वरप्पा यांनी दिली आहे.
बेंगळूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना मंत्री ईश्वरप्पा यांनी आपल्यावर करण्यात आलेल्या कमिशन संदर्भातील आरोपावर प्रतिक्रिया दिली. पंचायतराज विभागातून संतोष यांना कोणतीही वर्क ऑर्डर देण्यात आली नसल्याचे सांगितले. यासंदर्भात केंद्रीय ग्रामविकास विभागाला आमच्या अधिकार्यांनी विस्तृत माहिती दिली आहे. संतोष पाटील हि व्यक्ती कोण आहे हेदेखील आपल्याला माहीत नाही. यासंदर्भात बेळगाव जिल्हा भाजप अध्यक्षांना देखील विचारण्यात आले असता त्यांनीही या व्यक्तीबद्दल आपल्याला माहित नसल्याचे सांगितले आहे. आपल्याविरोधात रचण्यात आलेले हे षडयंत्र असल्याचे मंत्री ईश्वरप्पा म्हणाले.
केंद्रीय विभागाला करण्यात आलेल्या तक्रारीत संतोष पाटील यांनी केलेल्या आरोपाचा आमच्या विभागाशी कोणताही संबंध नाही. या षड्यंत्रात कोणाचा हात आहे हे अद्याप आपल्याला समजले नसून वर्क ऑर्डरच दिली नाही तर काम करण्याचा प्रश्नच कुठे उद्भवतो असा सवाल देखील ईश्वरप्पांनी केला.
Belgaum Varta Belgaum Varta