

कृषी, पर्यटनाला चालना देण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय
बंगळूर : राज्य मंत्रिमंडळाने गुरुवारी झालेल्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. अन्नभाग्य योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना दिला जाणारा ५ किलो मोफत तांदूळ बंद करून त्याऐवजी ‘इंदिरा फूड किट’ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, कृषी, पर्यटनाला चालना देण्याबरोबरच अन्य कांही महत्वाचे निर्णय घेण्यात आले.
अन्नभाग्य योजनेत बदल करताना मंत्री एच. के. पाटील यांनी सांगितले की, आता लाभार्थ्यांना ५ किलो तांदळाऐवजी त्याच किमतीच्या अन्न किटचे वाटप केले जाईल. या किटमध्ये तांदूळ, स्वयंपाकाचे तेल, साखर, मीठ आणि इतर आवश्यक वस्तूंचा समावेश असेल. किट वितरणासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अंमलबजावणीची तारीख निश्चित केली जाईल. त्यांनी मान्य केले की, या योजनेमुळे सरकारवरचा आर्थिक भार काहीसा वाढू शकतो.
इंदिरा फूड किटमध्ये समाविष्ट वस्तू
तूर डाळ – १ किलो
हरभरा – १ किलो
स्वयंपाकाचे तेल – १ किलो
साखर – १ किलो
मीठ – १ किलो
मंत्रिमंडळ बैठकीतील इतर महत्त्वाचे निर्णय
कृषी क्षेत्रासाठी आर्थिक मदत : कृषी क्षेत्राला बळकटी देण्यासाठी बियाणे महामंडळाला खतांचा साठा करण्यासाठी २०० कोटी रुपयांचे कर्ज मिळविण्यासाठी सरकारी हमी देण्यात आली आहे. तसेच, कृषी संचलन योजनेअंतर्गत १५ अतिरिक्त तालुक्यांमध्ये ९० कोटी रुपयांची कामे करण्यात येणार आहेत.
भरतीतील वयोमर्यादा सवलत : राज्य नागरी सेवा पदांसाठी सर्व श्रेणीतील उमेदवारांना कमाल वयोमर्यादेत ३ वर्षांची सूट देण्याच्या आदेशाला पूर्वलक्षी प्रभावाने मान्यता.
कामगारांच्या मुलांसाठी निवासी शाळा : नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी अंदाजे ४०५ कोटी ५५ लाख रुपये खर्चाच्या ११ निवासी शाळांच्या स्थापनेस प्रशासकीय मान्यता.
पुलांच्या पुनर्बांधणीसाठी प्रकल्प : राज्यातील पुलांच्या पुनर्बांधणी आणि पुनर्वसनासाठी २,००० कोटी रुपयांचा प्रकल्प तत्वतः मंजूर.
नगरपालिकेचा दर्जा : बिदर जिल्ह्यातील औराद नगर पंचायतीचे नगरपालिकेत रूपांतर करण्यास मंजुरी.
जलशुद्धीकरण प्रकल्प : राजकालूवे फेज-२ अंतर्गत ४० एमएलडी क्षमतेचा जलशुद्धीकरण प्रकल्प उभारणी आणि पाच वर्षांच्या देखभालीसाठी २९.७० कोटी रुपयांच्या प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता.
आयटी पार्क आणि इको-टुरिझम प्रकल्पांना हिरवा कंदील:
देवराबैले, मंगळूर येथे पीपीपी मॉडेल अंतर्गत १३५ कोटी रुपयांचा आयटी पार्क प्रकल्प उभारण्यास मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली. हा पार्क ३.५ लाख चौरस फूट क्षेत्रात उभारला जाणार आहे.
याशिवाय, ग्रामीण बंगळूरमधील ऐतिहासिक टाटागुनी इस्टेटमध्ये ९९ कोटी रुपयांचा इको-टुरिझम प्रकल्प राबविण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान, बंगळूर उत्तर जिल्ह्यातील माचोनाहळ्ळी गावातील विविध संस्थांना देण्यात आलेल्या वनजमिनी परत मिळवण्याबाबतही चर्चा झाली. संयुक्त सर्वेक्षण अहवाल प्राप्त झाल्यानंतर या संदर्भात अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.
Belgaum Varta Belgaum Varta