

बंगळूर : चित्रदुर्गचे काँग्रेस आमदार वीरेंद्र पप्पी यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. बेकायदेशीर ऑनलाइन सट्टेबाजी प्रकरणाच्या तपासादरम्यान अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) त्यांच्या चळ्ळकेरे येथील घरावर आणि फेडरल बँकेतील दोन लॉकरवर छापा टाकून तब्बल ५०.३३ कोटी रुपयांचे ४०
ईडीने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या छाप्यांपूर्वीही १०३ कोटी रुपयांची मालमत्ता, ज्यामध्ये २१ किलो सोने, रोख रक्कम, दागिने आणि आलिशान वाहने यांचा समावेश आहे, आधीच जप्त करण्यात आली होती.
ईडी अधिकाऱ्यांनी सांगितले की, आतापर्यंत आमदार वीरेंद्र पप्पी यांच्या ताब्यातून एकूण १५० कोटी रुपयांची रोख रक्कम आणि सोने जप्त करण्यात आले आहे. छाप्यांदरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे ईडीने वीरेंद्र यांच्या निवासस्थानासह फेडरल बँकेतील लॉकरांची तपासणी केली. यामध्ये ४० किलो सोन्याचे बार आढळले.
बेकायदेशीर ऑनलाइन बेटिंग रॅकेटचा पर्दाफाश
तपासात असे समोर आले आहे की, वीरेंद्र पप्पी आणि त्यांचे काही नातेवाईक व मित्र ‘किंग ५६७’, ‘राजा ५६७’ अशा अनेक बेकायदेशीर ऑनलाइन बेटिंग वेबसाइट्सचे ऑपरेशन चालवत होते.
खेळाडूंना फसवून मिळालेली रक्कम फोनपे सासारख्या डिजिटल पेमेंट गेटवेमार्फत गोळा केली जात होती. नंतर ती रक्कम म्युल अकाउंट्सच्या नेटवर्कद्वारे भारतातील आणि परदेशातील ऑपरेटरकडे हस्तांतरित केली जात होती.
ईडीच्या तपासानुसार, आमदार पप्पी यांनी सुमारे दोन हजार कोटी रुपयांच्या व्यवहारात सहभाग घेतला होता.
परदेशी बँकांमध्ये पैसे हस्तांतरित
सट्टेबाजीतून मिळालेली रक्कम बेकायदेशीररीत्या परदेशी बँक खात्यांमध्ये वळवण्यात आली. वीरेंद्र पप्पी, त्यांचे भाऊ के. सी. तिप्पेस्वामी आणि पृथ्वीराज यांनी दुबईमध्ये डायमंड सॉफ्टटेक, टीआरएस टेक्नॉलॉजीज आणि प्राइम ९ टेक्नॉलॉजीज या नावांनी कॉल सेंटर स्थापन करून ऑनलाइन गेमिंग व्यवसाय चालवला होता.
खर्च आणि आर्थिक व्यवहारांचे गुंतागुंतीचे जाळे
ईडीच्या मते, वीरेंद्र आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बेटिंगमधून मिळालेल्या पैशातून आंतरराष्ट्रीय प्रवास, हॉटेल बुकिंग, मार्केटिंग, एसएमएस सेवा, वेबसाइट होस्टिंग आणि सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन यासाठी खर्च केला. हे सर्व खर्च खच्चर खात्यांच्या माध्यमातून भागवले जात होते, ज्यामुळे पैशांचा मूळ स्रोत लपवला गेला.
अटक आणि न्यायालयीन कारवाई
ईडीने कोलकाता शाखेच्या मदतीने वीरेंद्र पप्पीला सिक्कीममधील गंगटोक येथून अटक केली. त्यानंतर त्याला बंगळुरातील कोरमंगल येथील न्यायालयात हजर करण्यात आले, जिथे ३५ व्या सीसीएच न्यायालयाने त्याला पाच दिवसांची ईडी कोठडी सुनावली.
२८ ऑगस्ट रोजी वीरेंद्र पप्पी यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता, मात्र त्यास अद्याप मंजुरी मिळालेली नाही.
तपास अधिकारी म्हणतात की, “वीरेंद्र पप्पी आणि त्यांच्या नेटवर्कने राज्यातच नव्हे तर परदेशातही बेकायदेशीर सट्टेबाजीचे मोठे साम्राज्य उभे केले आहे. तपासाचा व्याप वाढवला असून, निधीच्या प्रवाहावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.”

Belgaum Varta Belgaum Varta