

बंगळूर : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी काल रात्री आपल्या जवळच्या मंत्र्यांसोबत घेतलेल्या स्वतंत्र बैठकीमुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चा सुरू झाल्या आहेत. “नोव्हेंबर क्रांती”च्या कुजबुजदरम्यान या बैठकींनी उत्सुकता निर्माण केली आहे.
मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर, एच.सी. महादेवप्पा आणि सतीश जारकीहोळी यांनी स्वतंत्र बैठक घेतली होती. त्यांच्या खात्यांमध्ये हस्तक्षेप वाढल्याचा आणि अंतर्गत आरक्षण तसेच कुरुब समाजाचा अनुसूचित जातींमध्ये समावेश या मुद्द्यांवर असंतोष असल्याचे समजते.
त्याच रात्री मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी तिघा मंत्र्यांना घरी बोलावून एक तासाहून अधिक काळ गुप्त चर्चा केली. या बैठकीत मंत्रिमंडळ विस्ताराचाही विषय चर्चेला आला असल्याचे वृत्त आहे. सोमवारी सर्व मंत्र्यांसाठी मुख्यमंत्र्यांकडून डिनर पार्टी आयोजित करण्यात आली आहे.
गृहमंत्री परमेश्वर यांनी मात्र या बैठकींचा राजकीय अर्थ काढू नये, असे सांगितले. “असे बैठकी घेणे नवीन नाही; काही मुद्दे संवेदनशील असल्याने आम्ही स्वतंत्र चर्चा केली,” असे त्यांनी स्पष्ट केले.
अतिरिक्त उपमुख्यमंत्रीपदाची कोणतीही मागणी नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच “मुख्यमंत्र्यांच्या जेवण बैठकीचा कोणताही राजकीय अजेंडा नाही, ती केवळ सौजन्य बैठक आहे,” असेही त्यांनी नमूद केले.

Belgaum Varta Belgaum Varta