
आता लाल-पिवळ्या ध्वजाची सक्ती
बंगळूर : “मला महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बेळगावातील निदर्शनाबद्दल कोणतीही माहिती नाही. गृहमंत्र्यांकडे त्याबद्दल माहिती असू शकते. एकीकरण समितीचे लोकही कन्नडीगच आहेत. त्यांचे परिवर्तन करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, अशी मुक्ताफळे राज्याचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी उधळली. बेळगावमधील महाराष्ट्र एकीकरण समितीने काळ्या दिनानिमित्त काढलेल्या अभूतपूर्व मिरवणुकीबाबत विचारलेल्या प्रश्नावर ते प्रतिक्रीया देत होते.
राज्यात करण्यात आलेल्या कन्नड सक्तीनंतर सरकारी व खासगी संस्थांना लाल-पिवळा (कन्नड) ध्वज लावण्याची सक्ती करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
भाषावार प्रांतरचनेत बेळगाव, कारवार, निपाणी, बिदरसह बहूसंख्य मराठी भाषिक सीमाभाग कर्नाटकात डांबल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र एकिकरण समितीच्या नेतृत्वाखाली मराठी भाषिक एक नोव्हेंबरला सीमाभागात काळादिन पाळून गेली अनेक वर्षे निषेध मिरवणुक काढीत आहेत व महाराष्ट्रात सामिल होण्याची ईच्छा व्यक्त करीत आहेत. आज काढण्यात आलेल्या निषेध मिरवणुकीला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. त्यामुळे बिथरलेल्या कन्नडीग पत्रकारांनी याबाबत विचारले असता उपमुख्यमंत्री शिवकुमार म्हणाले, ज्याला कर्नाटकात राहायचे आहे तो कन्नड असला पाहिजे. समितीच्या लोकांनीसुध्दा कर्नाटकच्या विधानसभेत प्रवेश केला आहे.”
कन्नड ध्वजाची सक्ती
“पुढील मंत्रिमंडळ बैठकीत नोव्हेंबर महिन्यात खासगी आणि सरकारी कार्यालयांमध्ये कन्नड ध्वज अनिवार्य करण्याबाबत चर्चा करून निर्णय घेतला जाईल,” असे उपमुख्यमंत्री म्हणाले. विधान सौध येथील भुवनेश्वरी पुतळ्याजवळ त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
इंग्रजी आणि हिंदीच्या हल्ल्यांपासून कन्नडचे आपण सर्वांनी संरक्षण केले पाहिजे,” असे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. देशातील कोणत्याही राज्यात ध्वज किंवा राष्ट्रगीत नाही. पण आमच्याकडे दोन्ही आहेत. आम्ही फलकांवर ६० टक्के कन्नड भाषा अनिवार्य केली आहे. आम्ही बंगळुरमधील उद्योग, कारखाने आणि व्यावसायिक केंद्रांमध्ये राज्योत्सव साजरा करणे अनिवार्य केले आहे,” असे ते म्हणाले.
नोव्हेंबर क्रांती
नोव्हेंबर क्रांतीबद्दल बोलताना कोणीही कंटाळू नये. मी आणि मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी जे काही सांगायचे ते सर्व सांगितले आहे, असे उपमुख्यमंत्री म्हणाले. ते म्हणाले, “कोणत्याही नेत्याने नोव्हेंबर क्रांतीसह कोणत्याही मुद्द्याने कंटाळू नये. मुख्यमंत्री आणि मी बोललो आहोत. आपल्याला एवढेच म्हणायचे आहे. बाकी सर्व काही निरर्थक आहे,” असे ते उपहासात्मकपणे म्हणाले.
Belgaum Varta Belgaum Varta