
मुख्यमंत्री बदल, सत्ता वाटपावरून काँग्रेसमध्ये खळबळ
बंगळूर : राज्यातील राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघाले आहे. “नोव्हेंबर क्रांती”, मंत्रिमंडळ फेरबदल आणि सत्तावाटप या चर्चांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या आजच्या दिल्ली भेटीने राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण केली आहे.
शिवकुमार आज दुपारी ३ वाजता दिल्लीला रवाना झाले असून, त्यांनी सिंचन विषयक प्रकरणावर वकिलांशी चर्चा करण्यासाठी हा दौरा असल्याचे सांगितले आहे. मात्र, सूत्रांच्या माहितीनुसार ते दिल्लीतील कर्नाटक भवनमध्ये थांबणार असून, उद्या हायकमांडच्या नेत्यांना भेटण्याची शक्यता आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेला वेग आला आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या महिन्याच्या १४ नोव्हेंबरला दिल्लीला जाण्याची घोषणा केली असून, तेथे राहुल गांधी, सोनिया गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांच्याशी मंत्रिमंडळ फेरबदलाबाबत चर्चा होणार आहे. त्याआधीच डी. के. शिवकुमार यांचा दिल्ली दौरा सुरू झाल्याने राजकीय समीकरणांवर नवे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
काँग्रेसच्या गोटात मंत्रिमंडळ फेरबदल आणि सत्ता-वाटपाच्या चर्चा चांगल्याच रंगल्या आहेत. मुख्यमंत्रीपदाच्या कालावधीबाबत केलेली विधाने आणि नेत्यांचे परस्परविरोधी वक्तव्य यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या पार्श्वभूमीवर गृहमंत्री जी. परमेश्वर यांनी मात्र स्पष्ट केले की, “सध्या मी दिल्लीला जात नाही. गरज पडल्यास जाईन,” असे त्यांनी सांगितले. वरिष्ठ मंत्र्यांना वगळण्याच्या हायकमांडच्या निर्णयाबाबत विचारले असता त्यांनी मौन बाळगले.
दरम्यान, मंत्री सतीश जारकीहोळी यांचा नियोजित दिल्ली दौरा अचानक रद्द करण्यात आला आहे. तर, सिद्धरामय्या सरकार या महिन्यात अडीच वर्षे पूर्ण करीत असल्याने बिहार निवडणुकीनंतर सत्ता-वाटप आणि फेरबदलाच्या हालचालींना आणखी वेग येणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
भाजपचा व्यंग्यात्मक हल्ला
काँग्रेसमधील सत्तासंघर्षावर भाजपने सोशल मीडियावर व्यंग्यात्मक टीका केली आहे. ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) वर शेअर केलेल्या एका “संगीत खुर्ची”च्या गाण्याद्वारे भाजपने सरकारवर निशाणा साधला.
भाजपने लिहिले आहे, “सिद्धरामय्या, डी.के. शिवकुमार, जी. परमेश्वर आणि सतीश जारकीहोळी हीच नोव्हेंबर क्रांतीची उलटी गिनती आहे.”
राज्यातील सत्तेच्या खेळात आता पुढील काही दिवसांत ‘संगीत खुर्चीचा क्लायमॅक्स’ दिसण्याची शक्यता राजकीय तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta