
आमदार राजू कागे यांचे केंद्र, राज्य सरकारला पत्र
बंगळूर : उत्तर कर्नाटकात वेगळ्या राज्याची मागणी पुन्हा एकदा गाजत आहे. सत्ताधारी काँग्रेसचे आमदार राजू कागे यांनी राष्ट्रपती, पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांना पत्र लिहून उत्तर कर्नाटक वेगळे राज्य म्हणून स्थापन करण्याची मागणी केली आहे. त्यांच्या या पत्रामुळे राज्याच्या राजकारणात चांगलीच खळबळ माजली आहे.
राजू कागे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, विकासाच्या बाबतीत उत्तर कर्नाटकातील जिल्ह्यांवर अन्याय्य वागणूक दिली जात आहे. “आमच्या प्रदेशाला सापत्न भावनेने वागवले जात आहे,” असे त्यांनी ठामपणे नमूद केले आहे. त्यांनी एकूण १५ जिल्ह्यांचा समावेश असलेले उत्तर कर्नाटक वेगळे राज्य बनवावे, अशी मागणी केली आहे.
आमदार कागे म्हणाले, “मी नऊ वेळा आमदार म्हणून निवडून आलो आहे. आमच्या प्रदेशाच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतंत्र राज्याची गरज आहे. मी भाजपमध्येच राहणार असून, त्या राज्यातही मुख्यमंत्री होण्यास पात्र आहे. आम्ही कन्नडवासी आहोत आणि कन्नड भाषा आमची ओळख आहे.”
कागे यांनी दिवंगत माजी मंत्री उमेश कत्ती यांच्या भूमिकेची आठवण करून दिली. “उमेश कत्ती यांनी नेहमीच सांगितले की आम्ही दृढ कन्नडवासी आहोत. पण विकासासाठी उत्तर कर्नाटकाला स्वतंत्र राज्य हवे,” असे त्यांनी नमूद केले.
सध्या देशात ३० राज्ये आहेत आणि ५० राज्ये करण्याची चर्चा सुरू आहे. “उत्तर प्रदेशची २१ कोटी लोकसंख्या चार राज्यांत विभागावी, महाराष्ट्राची ११ कोटी लोकसंख्या तीन राज्यांत विभागावी, आणि कर्नाटकाची ६.५ कोटी लोकसंख्या लक्षात घेऊन दोन राज्यांत विभाजन करावे,” अशीही मागणी आमदार कागे यांनी केली आहे.
होराट समितीचीही मागणी
या पार्श्वभूमीवर उत्तर कर्नाटक होराट समिती आणि उत्तर कर्नाटक विकास वेदिके यांनी तीन प्रमुख मागण्या मांडल्या असून, त्या येत्या बेळगावच्या हिवाळी अधिवेशनात मान्य न झाल्यास सुवर्ण विधान सौधावर वेगळ्या राज्याचा ध्वज फडकवण्याचा इशारा दिला आहे.
उत्तर कर्नाटकातील राजकीय आणि सामाजिक संघटना आता या मागणीवर ठाम आहेत. आगामी अधिवेशनात या विषयावर मोठा संघर्ष होण्याची चिन्हे दिसत आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta