
बेंगळुरू : देशभरात काँग्रेसची कामगिरी समाधानकारक नसतानाच कर्नाटकमध्ये सत्तेची सूत्रे कोणाच्या हाती राहणार, यावरून मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांच्यातील संघर्ष चिघळत चालला आहे. बिहार विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या धक्क्यानंतर पक्ष नेतृत्वाचे लक्ष आता सरळ कर्नाटकाकडे वळले असून, दोन्ही गटांनी दिल्ली दरबारात आपापली ताकद दाखवण्यास सुरुवात केली आहे. सिद्धरामय्या या महिन्यात अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करत असून पुढील वर्षीचे अर्थसंकल्प सादर करण्याचा दावा करत “मीच मुख्यमंत्री राहणार” असे स्पष्टपणे सांगितले आहे. “नोव्हेंबर क्रांती” आणि नेतृत्वबदल हे केवळ माध्यमांमध्ये चर्चा असल्याचे सांगत त्यांनी पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करण्याचा संदेश दिला.
डीके शिवकुमार गट सक्रिय झाला
पण दुसरीकडे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार आपल्या पद्धतीने लाँबिंग करत आहेत. सिद्धरामय्या यांच्या कार्यकाळाचा पहिला टप्पा संपताच शिवकुमार गट सक्रिय झाला आहे. तीन आमदार व एका मंत्र्याने दिल्ली गाठून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी भेट घेतली. या भेटीचे फोटो, व्हिडिओ बाहेर आल्यानंतर नेतृत्वबदलाच्या चर्चांना जोर आला आहे. शिवकुमार मात्र “मला या भेटीची काही माहित नाही” असे सांगत शांत भूमिकेत दिसत असले तरी त्यांच्या समर्थकांचे लॉबिंग सुरू आहे. कर्नाटकाचे राजकीय समीकरण पाहता दोन्ही नेत्यांची ताकदही वेगवेगळी पण प्रभावी आहे. ओबीसी समुदायातील मजबूत पकड, दीर्घ अनुभव आणि पक्षातील वरिष्ठता या आधारावर सिद्धरामय्या स्वतःला काँग्रेससाठी अपरिहार्य ठरवत आहेत. ओबीसी मतांवर अवलंबून असलेल्या काँग्रेससाठी त्यांना बदलणे जोखमीचे ठरू शकते. पक्षाने त्यांना राष्ट्रीय ओबीसी सल्लागार परिषदेत स्थान दिल्यामुळे त्यांचे महत्व आणखी वाढले आहे.
तर दुसरीकडे डीके शिवकुमार हे वोक्कलिगा समाजाचे प्रमुख नेते आहेत. जुन्या म्हैसूर प्रदेशातील काँग्रेसला त्यांनी उभारी दिली. संघटन बांधणी, निवडणूक व्यवस्थापन आणि संकटमोचक अशी ओळख असलेल्या शिवकुमारांकडे मोठा जनाधार आहे. लोकसभा निवडणुकीत वोक्कलिगा मत भाजपकडे झुकल्याने कर्नाटकात संतुलन साधण्यासाठी शिवकुमार यांची भूमिका अधिक महत्त्वाची ठरते. त्यामुळे त्यांचा मुख्यमंत्रीपदाचा दावा हलक्यात घेण्यासारखा नाही.
सिद्धरामय्या पद सोडण्यास तयार नाहीत
या संघर्षात सिद्धरामय्या पद सोडण्यास तयार नाहीत, तर शिवकुमार हायकमांडच्या निर्णयाची प्रतीक्षा करत सावध पण ठाम तयारी करत आहेत. एका कार्यक्रमात त्यांनी स्पष्ट संकेत दिले. “कोणीही कायमचे नसते, काळजी करू नका, मी रांगेत पहिला आहे.” पक्षाच्या कार्यक्रमात डीके शिवकुमार म्हणाले, “मी हे पद (प्रदेशाध्यक्ष) कायमचे धारण करू शकत नाही. साडेपाच वर्षे झाली आहेत आणि मार्चमध्ये सहा वर्षे होतील.” ते पक्षाच्या किंवा गांधी कुटुंबाच्या विरोधात भूमिका घेऊ इच्छित नाहीत आणि हायकमांडने सहमती दर्शवावी यासाठी ते सावधगिरीने आग्रही आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta