
बेंगळूरु : गेल्या महिन्याभरापासून माझ्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यात तीव्र मतभेदाचे वातावरण निर्माण झाले आहे. यावरून राजकीय गोंधळ निर्माण झाला आहे. मात्र आमच्या कोणत्याही प्रकारचे मतभेद नाहीत आणि या पुढेही राहणार नाहीत. भाजप आणि जेडीएसच्या कटकारस्थानांना आम्ही दोघे मिळून समर्थपणे तोंड देऊ अशी माहिती, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आज शनिवारी संयुक्त पत्रकार परिषदेत घेऊन डी. के. शिवकुमार यांच्यात असलेले मतभेद मिटविले असल्याचे दाखवून दिले आहे.
काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठांनी केलेल्या सूचनेनुसार सिद्धरामय्या यांनी डी. के. शिवकुमार यांना आज आपल्या निवासस्थानी सकाळी चहापानासाठी बोलवले होते. या चहापानानंतर डी. के. शिवकुमार यांच्यासोबत, पत्रकारांशी बोलताना सिद्धरामय्या म्हणाले, आम्हाला पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी काम करायचे आहे. मागील विधानसभा निवडणुकीत आम्ही दोघांनी एकत्रितपणे काम करून यश संपादित केले आहे. 2028 ची विधानसभा निवडणूक त्याचबरोबर जिल्हा पंचायत, तालुका ग्राम पंचायत निवडणुका एकत्रितपणे काम करायचे आहे. आम्हां दोघांचे लक्ष यावर जास्त आहे. याबाबतीत आम्ही दोघांनी मिळून सविस्तरपणे चर्चा केली आहे. आमच्यात कोणत्याही प्रकारचे मतभेद नाहीत आणि यापुढेही राहणार नाहीत असेही त्यांनी स्पष्ट केले.
आठ डिसेंबरपासून बेळगावात हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. या अधिवेशनात आमच्यावर अविश्वासाचा ठराव आणण्याचे भाजप आणि जेडीएसचे नेते सांगत आहे. प्रत्यक्षात हे दोन्ही पक्ष खोटे आरोप आणि प्रचार करत आहेत. त्यांच्या आरोपांना आमचे सरकार अधिवेशनात समर्थपणे सामोरे जाईल. यासाठी डी. के. शिवकुमार यांच्यासोबत मी सविस्तर चर्चा केली आहे, असेही सिद्धरामय्या यांनी सांगितले आहे.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यात गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री पदावरून जोरदार संघर्ष निर्माण झाल्याचे पाहायला मिळत होते. मात्र आज दोघांनी एकत्र चर्चा करून घेतलेल्या निर्णयामुळे दोघातील संघर्षाचे वादळ शमल्याचे दिसून येत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta