
बंगळूर : राज्यातील रास्त भाव दुकानांमधून इंदिरा फूड किटचे वितरण अधिक पारदर्शक करण्यासाठी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी क्यूआर स्कॅनिंग अनिवार्य करण्याचे आदेश अन्न विभागाला दिले आहेत. अन्नभाग्य योजनेअंतर्गत मिळणाऱ्या अतिरिक्त ५ किलो तांदळाच्या बदल्यात इंदिरा फूड किट देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने आधीच मंजूर केला आहे.
सोमवारी बंगळुर येथे झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री सिद्धरामय्या, अन्न व नागरी पुरवठा मंत्री के.एच. मुनियप्पा, मुख्यमंत्र्यांचे राजकीय सचिव नासिर अहमद, अतिरिक्त मुख्य सचिव अंजुम परवेझ तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. किटमधील साहित्य उच्च गुणवत्तेचे आणि वितरण प्रक्रिया पारदर्शक राहावी, यावर मुख्यमंत्र्यांनी विशेष भर दिला.
क्यूआर स्कॅनिंगसह नवे सॉफ्टवेअर
प्रत्येक रास्त भाव दुकानात क्यूआर-आधारित सॉफ्टवेअर बसवण्यात येणार असून रेशनकार्डधारकांना त्याद्वारे किटचे वितरण केले जाईल. तसेच प्रत्येक महिन्याच्या १० तारखेपर्यंत महामंडळाच्या गोदामांमधून किंवा घाऊक विक्रेत्यांमार्फत किटची उपलब्धता सुनिश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले.
किटमध्ये काय मिळणार?
कुटुंबाच्या सदस्यसंख्येनुसार मिळणाऱ्या पाच किलो तांदळाऐवजी तूरडाळ, सूर्यफूल तेल, साखर आणि मीठ असलेला फूड किट दिला जाणार आहे.
सध्या दरमहा १.२५ कोटी इंदिरा फूड किटची गरज असून त्यासाठी अंदाजे ४६६ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. यासाठी दरमहा सुमारे १८,६२८ मेट्रिक टन डाळ आणि १२,४१९ मेट्रिक टन तेल, साखर व मीठ आवश्यक आहे. कुटुंबांना अधिक पोषक डाळ उपलब्ध करावी, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
खरेदी प्रक्रिया पारदर्शकतेवर भर
नाफेड, एनसीसीएफ किंवा केटीपीपीमार्फत साहित्याची खरेदी पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने करण्याचे निर्देश बैठकीत देण्यात आले. गुणवत्तेची कोणतीही तडजोड होऊ नये तसेच प्रमाणात कमी-जास्त होणार नाही याची विशेष काळजी घेण्याचे आदेश देण्यात आले.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितले की, “इंदिरा फूड किट वितरणात कोणतेही गैरप्रकार किंवा तक्रारी येणार नाहीत, यासाठी संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक आणि काटेकोरपणे राबवली जाईल.”
Belgaum Varta Belgaum Varta