
पोक्सो प्रकरणातील खटल्याला स्थगिती
बंगळूर : माजी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांना पोक्सो प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने आज मोठा दिलासा दिला आहे. येडियुरप्पा आणि इतर चार आरोपींनी कर्नाटक उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात दाखल केलेल्या याचिकेची सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा आदेश स्थगित केला.
मुख्य न्यायाधीश सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. येडियुरप्पा यांचे वकील सिद्धार्थ लुथरा यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशातील काही त्रुटींवर प्रकाश टाकत सविस्तर युक्तिवाद सादर केला. युक्तिवाद ऐकल्यानंतर खंडपीठाने खटल्याच्या कारवाईवर स्थगिती देत सीआयडीला नोटीस बजावली.
याआधी कनिष्ठ न्यायालयाने येडियुरप्पा आणि चार आरोपींना आरोपपत्र व आरोप निश्चिती प्रक्रियेबाबत समन्स जारी केले होते. या कारवाईला आव्हान देत येडियुरप्पा यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती; मात्र उच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळत खटला चालवण्यास परवानगी दिली होती. त्यानंतर विशेष सत्र न्यायालयाने सर्व आरोपींना आज वैयक्तिकरित्या हजर राहण्याचे आदेश दिले होते.
प्रकरण काय?
मार्च २०२४ मध्ये एका महिलेने तक्रार दाखल करताना बंगळुरातील डॉलर्स कॉलनी येथील निवासस्थानी येडियुरप्पा यांनी तिच्या १७ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला होता. मदतीसाठी गेल्यावर अत्याचार झाल्याचे तिने म्हटले होते.
तक्रारीनंतर सदाशिवनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन सरकारने तपास सीआयडीकडे वर्ग केला. सीआयडीने येडियुरप्पा आणि तीन सहकाऱ्यांविरुद्ध पुरावे नष्ट करणे व प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपांसह सुमारे ७५० पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळे सध्या या प्रकरणातील न्यायालयीन प्रक्रिया स्थगित राहणार आहे.
Belgaum Varta Belgaum Varta