
राजकीय वर्तुळात औत्सुक्य
बंगळूर : राज्य काँग्रेसमध्ये सत्तावाटपाच्या मुद्द्यावरून गटबाजी तीव्र होत असताना उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी दिल्लीमध्ये काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. दिल्लीतील कथित ‘मतचोरी’विरोधातील निषेध आंदोलनात मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री शिवकुमार यांच्यासह अनेक मंत्री व आमदार सहभागी झाले होते. आंदोलनानंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या परतले असले, तरी डी.के. शिवकुमार दिल्लीमध्येच थांबले.
नॅशनल हेराल्ड प्रकरणी दिल्ली पोलिसांनी बजावलेल्या नोटीसच्या पार्श्वभूमीवर हजर राहण्यासाठी शिवकुमार दिल्लीमध्ये होते. या काळात त्यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, एआयसीसी अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल, रणदीपसिंग सुरजेवाला यांच्यासह वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली.
राज्यात सत्तावाटपाचा वाद शिगेला पोहोचला असताना आणि काही आमदारांकडून नेतृत्वबदलाबाबत परस्परविरोधी विधाने होत असताना शिवकुमार यांनी दिल्लीतील भेटीगाठी घेतल्याचे विशेष महत्त्व मानले जात आहे. मात्र, या चर्चांचा तपशील त्यांनी उघड केलेला नाही. काँग्रेस हायकमांडकडे सत्तावाटपाचा प्रश्न लवकरात लवकर निकाली काढण्याची आणि पक्षातील गटबाजी थांबवण्याची विनंती केल्याचे समजते.
नेहमीप्रमाणेच भेटी
दिल्लीतील पत्रकारांशी बोलताना शिवकुमार म्हणाले, “मी सोनिया गांधी, राहुल गांधी, खर्गे साहेब, वेणुगोपाल यांना भेटलो आहे. दिल्लीला आलो की वरिष्ठ नेत्यांना भेटणे स्वाभाविक आहे, यात विशेष काही नाही.”
आज स्वतंत्र भेटी होणार का, असे विचारले असता त्यांनी सांगितले की, ज्येष्ठ आमदार शमनूर शिवशंकरप्पा यांच्या निधनामुळे आपण आणि मल्लिकार्जुन खर्गे विशेष विमानाने दावणगेरेला जाणार आहोत. खराब हवामानामुळे प्रस्थान उशिरा होत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
भेटी सुरूच राहतील
नेत्यांशी कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली, याबाबत त्यांनी मौन राखले. “मी जेव्हा जेव्हा दिल्लीला येतो, तेव्हा चर्चा होतच असतात. काळजी करू नका, या भेटी सुरूच राहतील,” असे गूढ उत्तर त्यांनी दिले.
नॅशनल हेराल्ड प्रकरणात दिल्ली पोलिसांसमोर हजर राहण्यासाठी वेळ मागितल्याची माहिती देताना ते म्हणाले, “मला आज हजर राहायचे होते; मात्र शमनूर शिवशंकरप्पा यांच्या अंत्यसंस्कारासाठी दावणगेरेला जात असल्याने पुढील आठवड्यात येण्याची विनंती केली आहे. नोटीसमध्ये एफआयआरची प्रतही देण्यात आलेली नाही.”
हायकमांडकडून तोडग्याचे संकेत
दिल्लीतील आंदोलनासाठी गेलेल्या अनेक मंत्री व आमदारांनी वरिष्ठ नेत्यांना सत्तावाटपाच्या वादामुळे पक्ष व सरकारची प्रतिमा मलीन होत असल्याचे सांगून लवकर तोडगा काढण्याची मागणी केली. यावर हायकमांडने विधानसभा अधिवेशन संपल्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना दिल्लीला बोलावून निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्याचे वृत्त आहे.
यापूर्वी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री शिवकुमार यांनी नाश्त्याच्या बैठकीत वाद संपल्याचे संकेत दिले होते. मात्र, बेळगाव अधिवेशनादरम्यान काही आमदारांच्या वक्तव्यांमुळे हा वाद पुन्हा समोर आला. यावर एआयसीसी अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी ‘थोडे शांत राहा, सर्व काही सुरळीत होईल,’ असा सल्ला दिल्याचे सांगितले जाते. संसदेचे अधिवेशन संपल्यानंतर हायकमांडकडून निश्चित तोडगा काढला जाईल, असा पक्षातील नेत्यांचा विश्वास आहे.
Belgaum Varta Belgaum Varta