
हुबळी : प्रेमविवाह केल्याच्या रागातून बापानेच सात महिन्यांची गर्भवती असलेल्या मुलीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना हुबळी तालुक्यातील इनाम वीरापूर गावात घडली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
या घटनेत मान्या पाटील (वय 20) या सात महिन्यांच्या गर्भवती तरुणीचा मृत्यू झाला आहे. मान्या हिने इनाम वीरापूर गावातील दलित समाजातील युवक विवेकानंद दोड्डमणी याच्याशी प्रेमविवाह केला होता. या विवाहाला मान्याच्या कुटुंबीयांचा तीव्र विरोध होता.
माहितीनुसार, पोलिसांच्या उपस्थितीत झालेल्या समझोता पंचायतनंतर सुमारे सात महिन्यांपूर्वी दोघांनी विवाह केला होता. मात्र, प्राणभयामुळे हे दाम्पत्य हावेरी जिल्ह्यात वास्तव्यास होते. 8 डिसेंबर रोजी ते पुन्हा आपल्या गावात परतले होते.
रविवारी सायंकाळी मान्याचे वडील प्रकाशगौड पाटील, नातेवाईक गुरुसिद्धनगौड पाटील आणि अक्षयगौड यांनी विवेकानंदच्या घरात घुसून धारदार शस्त्रांनी भीषण हल्ला केल्याचे समजते. या हल्ल्यात मान्याचा जागीच मृत्यू झाला.
या प्रकरणी वरील तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. प्रेमविवाहाला विरोधातून घडलेली ही घटना समाजाला हादरवून टाकणारी आहे.
Belgaum Varta Belgaum Varta