Tuesday , March 3 2026
Breaking News

गृहलक्ष्मी योजनेचा फेब्रुवारी–मार्च निधी लवकरच

Spread the love

 

मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर; बीपीएल रद्द झालेल्यांना लाभ नाही

बंगळूर : राज्यातील काँग्रेस सरकारच्या महत्त्वाकांक्षी हमी योजनांपैकी एक असलेल्या गृहलक्ष्मी योजनेबाबत महिला व बाल कल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. फेब्रुवारी आणि मार्च २०२५ या दोन महिन्यांसाठीचा निधी जाहीर करण्यात आला असून, वित्त विभागाची परवानगी मिळताच तो थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या, “गृहलक्ष्मी योजनेसाठी दोन महिन्यांचा निधी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी आधीच चर्चा झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात विधानसभेत उत्तर दिले आहे. वित्त विभागाची मंजुरी मिळताच निधी हस्तांतरित केला जाईल.”
मात्र, ज्यांची बीपीएल रेशनकार्डे रद्द करण्यात आली आहेत, त्यांना गृहलक्ष्मीचा लाभ दिला जाणार नाही, असेही मंत्री हेब्बाळकर यांनी स्पष्ट केले. राज्यात बीपीएल कार्डची पडताळणी सुरू असून, बेकायदेशीर रेशनकार्ड रद्द केली जात आहेत. अशा कार्डांच्या आधारे गृहलक्ष्मीचा लाभ घेणाऱ्यांचे पैसेही थांबवले जाणार आहेत.
यापूर्वी बीपीएल, एपीएल आणि अंत्योदय कार्डधारकांना गृहलक्ष्मीचा लाभ दिला जात होता. मात्र, करदाते असलेल्या लाभार्थ्यांची बीपीएल कार्डे रद्द करण्यात आल्याने त्यांचे गृहलक्ष्मीचे पैसेही थांबवण्यात आले आहेत. अपात्र रेशनकार्ड रद्द झाल्यामुळे काही लाभार्थ्यांना निधी मिळालेला नाही. अन्न विभागाकडून सुधारित माहिती प्राप्त होताच पात्र लाभार्थ्यांना निधी दिला जाईल, असेही त्यांनी सांगितले. जर संबंधित व्यक्ती करदाते नसतील, तर त्यांना गृहलक्ष्मीचा लाभ मिळेल, असे मंत्री म्हणाल्या.
दरम्यान, गृहलक्ष्मी सहकारी संस्था योजनेबाबत माहिती देताना मंत्री हेब्बाळकर यांनी सांगितले की, संस्थेच्या सदस्यांना दरमहा २०० रुपये जमा करावे लागतील. सहा महिन्यांनंतर ते कर्ज सुविधेसाठी पात्र ठरतील. त्यांच्या अध्यक्षतेखालील समिती पात्र लाभार्थ्यांची ओळख पटवून, जास्त अटी न घालता कर्ज उपलब्ध करून देणार आहे. भविष्यात आरोग्य विमा देण्याची योजनाही राबवली जाणार आहे.
महिला सुरक्षेच्या दृष्टीने अक्का पथक उपक्रमाबाबत माहिती देताना त्यांनी सांगितले की, महिला व बाल कल्याण विभाग आणि गृह विभागाच्या संयुक्त सहकार्याने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. अक्का पथक बस थांबे, मंदिरे, मॉल, उद्याने आदी ठिकाणी गस्त घालतील. शाळा व महाविद्यालयांमध्ये जाऊन मुलींमध्ये जागरूकता निर्माण केली जाईल. तक्रार देण्यास घाबरणाऱ्या मुलींची ओळख गुप्त ठेवली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सोशल मीडियावरील फसवणूक, तसेच कौटुंबिक समस्यांना तोंड देणाऱ्या महिलांनाही अक्का पथकच्या माध्यमातून तक्रार दाखल करता येईल, असे त्यांनी सांगितले. मंत्रिमंडळ बैठकीत या उपक्रमावर सविस्तर चर्चा झाली असल्याचेही त्यांनी नमूद केले.
हुबळी येथे एका महिलेला कपडे उतरविण्याच्या कथित घटनेबाबत प्रतिक्रिया देताना मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या, “ज्याने ही चूक केली आहे, त्याला शिक्षा झालीच पाहिजे. दोषींवर कठोर कारवाई व्हावी, ही माझी ठाम भूमिका आहे.”

About Belgaum Varta

Check Also

कर्नाटक सरकारकडून ऊस उत्पादकांना दिलासा; प्रतिटन ५० रुपये अनुदानासाठी ३०० कोटींची तरतूद

Spread the love  बंगळूर : राज्य सरकारने जाहीर केल्याप्रमाणे २०२५-२६ हंगामात साखर कारखान्यांना ऊस पुरवठा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *