Tuesday , March 3 2026
Breaking News

रासलीला व्हिडीओ प्रकरण : वरिष्ठ आयपीएस अधिकारी डॉ. के. रामचंद्रराव निलंबित

Spread the love

 

बंगळूर : महिलेसोबत अश्लील वर्तन केल्याचा आरोप असलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर, नागरी हक्क अंमलबजावणी संचलनालयाचे पोलीस महासंचालक (डीजीपी) तथा वरिष्ठ आयपीएस अधिकारी डॉ. के. रामचंद्रराव यांना राज्य सरकारने सेवेतून निलंबित केले आहे. यासंदर्भातील आदेश मंगळवारी रात्री उशिरा जारी करण्यात आला.
सरकारी कर्तव्यावर असताना, गणवेशातच महिलेसोबत अयोग्य वर्तन केल्याचे व्हिडीओतून प्रथमदर्शनी स्पष्ट होत असल्याने सरकारने हा प्रकार अत्यंत गंभीर मानला आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रामचंद्रराव यांना १० दिवसांच्या सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले होते. मात्र आता त्यांच्याविरोधात शिस्तभंगाची कारवाई करत निलंबनाचे आदेश देण्यात आले आहेत.
१९९३ च्या बॅचचे (कर्नाटक कॅडर) आयपीएस अधिकारी असलेल्या डॉ. रामचंद्रराव यांच्या वर्तनामुळे सरकारची प्रतिमा मलिन झाल्याचे प्रशासकीय व कर्मचारी सुधारणा विभागाच्या (डीपीएआर) आदेशात नमूद करण्यात आले आहे. त्यांनी अखिल भारतीय सेवा नियम, १९६८ मधील नियम ३ चे उल्लंघन केल्याचे प्रथमदर्शनी आढळून आल्याचेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
विभागीय चौकशी पूर्ण होईपर्यंत निलंबन लागू राहील. निलंबन काळात नियमांनुसार भत्ते मिळतील; मात्र कोणत्याही परिस्थितीत पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडू नये, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
डॉ. रामचंद्रराव यांची पार्श्वभूमी
आंध्र प्रदेशातील गुंटूर येथील रहिवासी असलेले डॉ. रामचंद्रराव यांनी दावणगेरे, चिक्कमंगळूर, म्हैसूर, हुबळी-धारवाड आणि बंगळुर येथे एसपी, डीआयजी, आयजी आणि एडीजीपी अशा विविध पदांवर सेवा बजावली आहे.
सप्टेंबर २०२३ मध्ये त्यांना डीजीपी पदावर पदोन्नती देण्यात आली होती. निलंबनाच्या वेळी ते कर्नाटक नागरी हक्क अंमलबजावणी विभागाचे डीजीपी म्हणून कार्यरत होते.
दुसरे लग्न आणि वाद
रामचंद्रराव यांचे दुसरे लग्न झाले होते. त्यांच्या पत्नीच्या पहिल्या लग्नातून जन्मलेल्या मुलीपैकी एक म्हणजे अभिनेत्री रन्या राव. परदेशातून सोन्याची तस्करी केल्याप्रकरणी रन्या राव अडकल्यानंतर, रामचंद्रराव यांनी तिच्याशी कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले होते.
गेल्या वर्षी त्यांनी आपल्या सावत्र मुलाचा विवाह ज्येष्ठ अभिनेत्री व माजी मंत्री जयमाला यांच्या कन्येशी मोठ्या थाटात लावून दिला होता.

मागील आरोप आणि प्रकरणे
सोन्याच्या तस्करीचे प्रकरण : दुबईहून १४.२ किलो सोन्याची तस्करी केल्याप्रकरणी रन्या राव हिला बंगळुर आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक झाली होती. या प्रकरणात रामचंद्रराव यांच्यावरही अप्रत्यक्ष आरोप झाले होते. त्यानंतर त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले होते. ऑगस्ट २०२५ मध्ये त्यांना पुन्हा सेवेत घेत नागरी हक्क अंमलबजावणी संचलनालयात डीजीपी म्हणून नियुक्त करण्यात आले.

म्हैसूर दरोडा प्रकरण (२०१४) : इलवाल येथे झालेल्या दरोड्यात लुटलेल्या दोन कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या गैरवापराचा आरोप त्यांच्यावर झाला होता. मात्र सीआयडी चौकशीत आरोप सिद्ध न झाल्याने न्यायालयाने प्रकरण निकाली काढले होते.

चडचण संशयास्पद हत्या प्रकरण : २०१७ मध्ये धर्मराज चडचण एन्काऊंटर व गंगाधर चडचण हत्या प्रकरणात त्यांचे नाव चर्चेत आले होते. नंतरच्या सीआयडी चौकशीत त्यांचा सहभाग नसल्याचे स्पष्ट झाले होते.

गरज पडल्यास सेवेतून बडतर्फीही – गृहमंत्री जी. परमेश्वर
रामचंद्रराव यांना अटक करण्याची मागणी भाजप नेत्यांकडून होत असल्याबाबत विचारले असता, गृहमंत्री म्हणाले की, तातडीने आवश्यक ती कारवाई करण्यात आली आहे. चौकशी पूर्ण झाल्यानंतर पुढील कोणतीही कारवाई होऊ शकते. गरज भासल्यास त्यांना सेवेतून वजाही केले जाऊ शकते. अशी वेळ आल्यास कोणतीही तडजोड न करता कठोर पाऊल उचलले जाईल. पोलिस विभागच नव्हे, तर राज्यातील कोणत्याही विभागात अशा प्रकारच्या घटनांना अजिबात सहन केले जाणार नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

About Belgaum Varta

Check Also

शिमोग्यात १६ वर्षीय विद्यार्थ्याची हत्या

Spread the love  क्रिकेट सामन्यातील वादातून घटना, सात अल्पवयीन ताब्यात बंगळूर : शिमोगा येथे सुलेबैलू …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *