
बेंगळूरू : कन्नड आणि मराठी या दोन्ही भाषा समृद्ध परंपरा लाभलेल्या असून कन्नड साहित्यातील अनेक महत्वपूर्ण कृतींचे मराठीत अनुवाद करून ज्येष्ठ अनुवादक डॉ. उमा कुलकर्णी यांनी मराठी साहित्यविश्वाला कन्नड संस्कृतीची खरी ओळख करून दिली. त्यांच्या साहित्यसेवेचा गौरव म्हणजे मराठी–कन्नड भाषिक ऐक्याचा गौरव होय, असे प्रतिपादन जागतिक दर्जाच्या चित्रकार, शिल्पकार व स्थापत्य विशारद डॉ. पुष्पा द्रविड यांनी केले.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ, पुणे आणि कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषद, कलबुरगी यांच्या संयुक्त विद्यमाने
मराठी भाषा दिनानिमित्त महाराष्ट्र मंडळ, बेंगळूरू येथे पुरस्कार प्रदान सोहळा, कवी संमेलन आणि डॉ. उमा कुलकर्णी यांची प्रकट मुलाखत आणि मराठी पुस्तकाचे प्रकाशन असा बहुविध कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. पुष्पा द्रविड यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी परिषदेचे अध्यक्ष गुरय्या रे. स्वामी होते.
अनुवादातून उभा राहिला सांस्कृतिक सेतू
कन्नड साहित्यातील अनेक महत्त्वपूर्ण ग्रंथांचे मराठीत अनुवाद करून डॉ. कुलकर्णी यांनी दोन्ही साहित्यप्रवाहांमध्ये अर्थपूर्ण देवाणघेवाण घडवून आणली आहे. भाषा वेगळी असली तरी साहित्यिक मूल्ये समान असतात, असे मत डॉ. द्रविड यांनी व्यक्त केले.
यावेळी डॉ. राजेंद्र पडतुरे पुरस्कृत ‘कायकरत्न’ पुरस्कार डॉ. उमा कुलकर्णी यांना प्रदान करण्यात आला. मिलिंद उमाळकर पुरस्कृत ‘कल्याणरत्न’ पुरस्कार इस्रोच्या शास्त्रज्ञ तनुजा पत्की देशपांडे यांना देण्यात आला. तसेच स्व. वैजनाथ शेगेदार स्मरणार्थ श्रीमती सुमन शेगेदार पुरस्कृत ‘काव्यरत्न’ पुरस्कार डॉ. संध्या राजन यांना प्रदान करण्यात आला.
कादंबरी’ शब्द मराठीचा – डॉ. कुलकर्णी
पुरस्कार स्वीकारल्यानंतर प्रकट मुलाखतीत बोलताना डॉ. उमा कुलकर्णी यांनी सांगितले की, कन्नड भाषा प्राचीन असली तरी कादंबरी लेखनाचा प्रारंभ मराठीतून झाला. ‘कादंबरी’ हा शब्दही मराठी भाषेतील असल्याचे त्यांनी नमूद केले. सध्याच्या काळात अनुवादित साहित्याला मोठी मागणी असून विविध भाषांतील संस्कृती परस्परांत रुजत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
इस्रोमधील वैज्ञानिक तनुजा पत्की देशपांडे यांनी या सन्मानामुळे विज्ञानाबरोबरच साहित्य क्षेत्रातही कार्य करण्याची प्रेरणा मिळाल्याचे सांगितले. ‘काव्यरत्न’ पुरस्कारप्राप्त डॉ. संध्या राजन यांनी परिषदेमुळे राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत परिषदेस एक लाख रुपयांची देणगी जाहीर केली.
कवी संमेलनास उत्स्फूर्त प्रतिसाद
कार्यक्रमाच्या प्रारंभी ज्येष्ठ साहित्यिक व्यंकटेश देवनपल्ली यांचे नेतृत्वात कवी संमेलन पार पडले. परवीन कौसर, लीना पेंढारकर, अर्चना देसाई, प्रतिभा टेकाडे, नम्रता कुलकर्णी, संदीप लिमये, तुषार भट, राकेश शेटे यांच्यासह अनेक कवींनी सहभाग नोंदविला.
यावेळी डॉ. अनुराग लव्हेकर लिखित ‘पुस्तके साद आणि दाद’ पुस्तकाचे प्रकाशन डॉ. पुष्पा द्रविड यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सर्व लव्हेकर कुटुंबीय उपस्थित होते.
डॉ. संध्या राजन यांनी कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषदेस एक लाख रुपये देणगी जाहीर करून एक लाखाचा धनादेश अध्यक्ष गुरय्या स्वामी यांच्याकडे सुपूर्त केला.
प्रवरा लिमये यांनी सूत्रसंचालन केले, तर दिपाली वझे यांनी आभार प्रदर्शन केले. डॉ. अनुराग लव्हेकर यांनी डॉ. उमा कुलकर्णी यांची प्रकट मुलाखत घेतली.
या बहुआयामी साहित्य सोहळ्यास साहित्यप्रेमींची मोठी उपस्थिती लाभली. कार्यक्रमातून मराठी–कन्नड सांस्कृतिक ऐक्याचा संदेश प्रभावीपणे अधोरेखित झाला. यावेळी तुषार भट आणि व्ही. टी. मास्ते यांचा विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी नामवंत मराठी लेखिका सानिया, शर्मिला पाठक पटवर्धन, श्याम वडाळकर, संदीप लिमये, चंद्रकांत पोकळे सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta