कन्नड अभिनेता सुदीपची पाठराखण, कन्नड संघटनांचे हिंदीविरोधी आंदोलन
बंगळूर : कर्नाटकात राष्ट्रभाषा हिदी विरोधी अभियान सुरूच आहे. अलिकडेच बॉलीवूड स्टार अजय देवगणने हिंदी हीच राष्ट्रभाषा असल्याचे हिंदीतून ट्विट केले होते. त्याला प्रत्युत्तर देताना, कन्नड अभिनेता सुदीप याने एका कार्यक्रमात हिंदी राष्ट्रभाषा कुठे आहे, असा प्रश्न उपस्थित केला. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी गुरूवारी (ता. २८) कन्नड अभिनेता सुदीपची पाठराखण करून अप्रत्यक्षपणे हिंदी भाषेला आपला विरोध दर्शविला.
हुबळी येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, आपापल्या राज्यात प्रादेशिक भाषा सर्वोच्च आहेत आणि सर्वांनी ते समजून घेतले पाहिजे आणि त्याचा आदर केला पाहिजे.
राष्ट्रभाषेबाबत बॉलीवूड स्टार अजय देवगणला कन्नड चित्रपट स्टार किच्चा सुदीपने ट्विटरवर दिलेल्या उत्तराच्या पार्श्वभूमीवर बोम्मई म्हणाले, सुदीपने जे सांगितले ते बरोबर आहे. भाषिक आधारावर राज्यांच्या पुनर्रचनेनंतर मातृभाषा किंवा प्रादेशिक भाषा महत्त्वाची आणि सर्वोच्च आहे. सर्वांनी ते समजून घेतले पाहिजे आणि त्याचा आदर केला पाहिजे.
द्वेषयुक्त भाषणावर
देशभरात, विशेषतः सोशल मीडियावर द्वेषयुक्त भाषणाच्या घटना वाढत असल्याचे निरीक्षण करून बोम्मई म्हणाले की, द्वेषयुक्त भाषणांना आळा घालण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार एक समिती स्थापन केली जाईल आणि त्याच्या आदेशाची मार्गदर्शक तत्त्वांद्वारे अंमलबजावणी केली जाईल.
जातीय किंवा धार्मिक भावना मनात असतात. भारत हा धर्मांमध्ये सुसंवाद आणि एकता असलेला देश आहे. शांतता आणि सौहार्द कायम राहण्यासाठी सर्वांनी आपले कर्तव्य बजावले पाहिजे, असेही ते म्हणाले.
हिंदीविरोधी आंदोलन
बॉलीवूड अभिनेता अजय देवगण याने हिंदी ही देशाची राष्ट्रभाषा असल्याच्या वक्तव्याविरोधात कन्नड संघटनांनी गुरुवारी येथे निदर्शने केली. कर्नाटक रक्षण वेदिकेच्या प्रवीण शेट्टी गटाने बंगळुरमधील म्हैसूर बँक सर्कलमध्ये फ्लॅश निषेध केला आणि अभिनेत्याच्या विरोधात घोषणाबाजी केली.
आंदोलनापूर्वी पोलिसांकडून कोणतीही परवानगी न घेतल्याने आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले. स्थानिक प्रादेशिक भाषांचा अनादर करणारे हिंदीसाठी ट्विट केल्याबद्दल त्यांनी अभिनेत्याची निंदा केली.
आंदोलकांनी अजय देवगणचे छायाचित्र हातात धरून त्याच्या विरोधात घोषणाबाजी केली. हिंदी लादण्याबाबत उत्तर भारतीय वारंवार कर्नाटकातील लोकांना चिथावणी देत असल्याचे आंदोलकांनी स्पष्ट केले.
हिंदी सिनेमे कन्नडिग बघतात आणि ज्या वेळी कन्नड फिल्म इंडस्ट्री वाढत आहे, ती खपवून घेतली जात नाही, असे एका आंदोलकाने पोलिसांनी खेचले जात असताना सांगितले.
कर्नाटक रक्षण वेदिकेचे अध्यक्ष टी. ए. नारायण गौडा यांनी स्पष्ट केले की, संविधानात हिंदी भाषेला दिलेल्या महत्त्वामुळे, हिंदी भाषिकांनी इतर भाषांकडे सरंजामी दृष्टिकोन विकसित केला आहे.
बॉलीवूड अभिनेता अजय देवगणचे विधान हे हिंदी सरंजामशाहीचे द्योतक आहे. घटनेतील हिंदीला महत्त्व देणाऱ्या तरतुदी वगळल्या पाहिजेत, अन्यथा हिंदी भाषिकांची ही सरंजामी वृत्ती संपणार नाही. प्रादेशिक भाषांवर त्यांचे वर्चस्व कायम राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.