
बेळगाव : भाजप आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी केलेल्या विधानानंतर विरोधकांनी भाजपाला टार्गेट करण्यात सुरुवात केली असून राजकीय वर्तुळात आता पद मिळविण्यासाठी द्याव्या लागणार्या पैशांसंदर्भात उलट सुलट चर्चा होऊ लागली आहे. यासंदर्भात बेळगावमध्ये सिद्धरामय्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना आपण पाच पैसेही न देता मुख्यमंत्री झालो असा टोला हाणलाय.
मुख्यमंत्री होण्यासाठी 2500 कोटी रुपये द्यावे लागतात, असा गौप्यस्फोट आमदार बसनगौडा पाटील यांनी केल्याप्रकरणी सिद्धरामय्या प्रतिक्रिया देत होते. 2500 कोटी रुपयांची मागणी कोणी केली? याचे उत्तर आता यत्नाळांनीच द्यावे, असे सांगत आपण कुणाला साधा चहा देखील न देता मुख्यमंत्री झालो. आमदारपदासाठी पक्षाने मला उमेदवारी दिली आणि त्यानंतर हायकमांडने देखील माझी निवड मुख्यमंत्री म्हणून केली असे सिद्धरामय्या म्हणाले.
पीएसआय परीक्षेत झालेला घोटाळा हा खरा आहे. मंत्र्यांकडून अत्यंत बेजबाबदारपणे वक्तव्ये होत आहेत. अशांना मंत्रीपदी राहण्याचा नैतिक अधिकार नाही. सत्यहरिश्चंद्राप्रमाणे आमदार आणि मंत्री बोलत असून आता अश्वथ नारायण आणि आरग ज्ञानेंद्र यांनी राजीनामा देण्याची मागणी सिद्धरामय्यांनी केली आहे. शिवाय कुंपणच शेत खात असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.
2023 साली होणार्या निवडणुकीत 40 टक्के कमिशन घेणार्यांवर जनता नक्कीच क्रम घेईल. आम्ही केलेल्या कामाव्यतिरिक्त भाजपने कोणतेही नवे काम केले नाही. म्हादई प्रश्नी काय करावे यावर अद्याप चर्चा सुरु आहे. नरेंद्र मोदी नेतृत्वाखालील सरकारमुळे जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडले असल्याबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला. डब्ल्यूएचओ 47 लाख जणांचा मृत्यू झाल्याचे सांगत आहे. मात्र पंतप्रधान केवळ पाच लाख जणांचाच मृत्यू झाल्याचे सांगत आहेत. यापैकी नेमके सत्य काय आहे? केंद्र सरकार खोटे बोलत असल्याचा आरोप देखील सिद्धरामय्यांनी केला.
पीएसआय परीक्षेत किंगमेकर कोण आहेत हे सत्य उघडकीस आल्यावर सरकार पडेल असे विधान कुमारस्वामी यांनी केले होते. यावर प्रतिक्रिया विचारण्यात आली असता खोटे बोलणार्यांच्या विधानावर आपण कोणतेही भाष्य करणार नसल्याचे सिद्धरामय्या म्हणाले. यावेळी आमदार लक्ष्मी हेब्बाळकर, माजी मंत्री ए. बी. पाटील, माजी मंत्री शाम घाटगे, काँग्रेस ग्रामीण घटक अध्यक्ष विनय नावलगट्टी आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta