हेडगेवारांच्या अभ्यासक्रमाला विरोध, पाठ्यक्रमाच्या वादावर लवकरच तोडगा
बंगळूर : विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी आरएसएसच्या मूळतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी शनिवारी सिध्दरामय्या यांना, ‘तुम्ही द्रविड किंवा आर्य’ ते स्पष्ट करा असे आवाहन केले. अभ्यासक्रमाच्या वादावर लवकरच तोडगा काढण्याची त्यांनी ग्वाही दिली.
मला सिद्धरामय्या यांना विचारायचे आहे, ते कुठून आले? ते द्रविड आहेत की आर्य? त्यानी आधी याचे उत्तर द्यावे, असे बोम्मई यांनी पत्रकारांना सांगितले.
आरएसएसचे संस्थापक हेडगेवार यांच्या भाषणाचा अभ्यासक्रमात समावेश करण्याचा वादाच्या पार्श्वभुमीवर शुक्रवारी, सिद्धरामय्या यांनी आश्चर्य व्यक्त केले आणि आरएसएसचे संस्थापक जनक, भाजपचे वैचारिक पालक, मूळ भारतीय आहेत का, असा प्रश्न उपस्थित केला. ते आर्य वंशाचे असावेत असे ते म्हणाले.
नेहरू-मोदी तुलना
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्याशी तुलना होऊ शकत नाही, असे सांगून बोम्मई यांनी सिद्धरामय्या यांनाही प्रत्युत्तर दिले.
निश्चितपणे, नेहरूंशी मोदींची तुलना होऊ शकत नाही, बोम्मई म्हणाले. चीनच्या आक्रमणादरम्यान नेहरूंनी योग्य पावले उचलली नाहीत आणि भारतीय भूमी आपल्या ताब्यात दिली. पण मोदींनी चीनच्या आक्रमकतेविरोधात जोरदार पावले उचलून भारताची भूमी वाचवली. तसेच मोदींनी पाकिस्तानशी तडजोड केली नाही. त्यांनी भारताच्या एकात्मतेसाठी काम केले आहे. अशी अनेक उदाहरणे आहेत. मोदींनीच भारताला मजबूत बनवले आहे, असे ते म्हणाले.
‘शिक्षणमंत्र्यांशी बोलणार’
पाठ्यपुस्तक समितीचे अध्यक्ष रोहित चक्रतीर्थ यांची हकालपट्टी करण्याच्या मागणीला उत्तर देताना बोम्मई म्हणाले, की मी याबाबत प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मंत्री बी. सी. नागेश यांच्याशी चर्चा करणार आहे. जे काही घडले ते शिक्षणमंत्र्यांना माहीत आहे. आम्ही निर्णय घेऊ, असे ते म्हणाले.
हेडगेवारांच्या अभ्यासाला सिध्दरामय्यांचा विरोध
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक के. बी. हेडगेवार यांच्या भाषणाचा दहावीच्या पाठ्यपुस्तकात समावेश करण्यावरून वाद सुरू असताना, काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते सिद्धरामय्या यांनी शुक्रवारी विचारले होते, आरएसएसचे लोक मूळचे भारतातील आहेत का? या देशातील आर्य मूळचे आहेत का? द्रविड हे मूळचे याच देशातील आहेत.
माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते म्हणाले, रोहित चक्रतीर्थ यांच्याकडे शाळकरी मुलांच्या पाठ्यपुस्तकांची जबाबदारी देण्यात आली आहे. यापेक्षा अविवेकी गोष्ट मी कधीच पाहिली नाही. चक्रतीर्थने प्रतिष्ठित देशभक्त भगतसिंग यांच्यावरील काही भाग काढून त्याजागी हेडगेवार यांचे भाषण दिले आहे. असा प्रश्न जर कोणी केला तर ते म्हणतात आपला हा देश सोडा. कोणाला देश सोडावा लागेल? आरएसएस मूळचा याच देशाचा आहे का? असा सिध्दरामय्या यांनी प्रश्न केला.
ते म्हणाले, आरएसएसला खऱ्या इतिहासाची भीती वाटते. सर्वसामान्यांना खरा इतिहास कळला तर काय होईल हे त्यांना माहीत आहे. त्यामुळे इतिहासाचा फसवा विपर्यास केला जात आहे. ते म्हणाले, संसदेत बसून विरोधी पक्षांचे म्हणणे ऐकून घेण्याचे धाडस नेहरूंमध्ये होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींमध्ये एवढे धाडस आहे का? सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे.
यावर प्रतिक्रिया देताना केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले, विरोधी पक्ष नेत्याला तथ्य माहित नाही किंवा ते राहुल गांधींना आणि मुस्लिमांना खूश करण्याचा प्रयत्न करीत आहेत.