विजापूर : मानसिक तणावातून महिलेने तिच्या दोन मुलींसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना विजापूर जिल्ह्यातील सिंदगी तालुक्यातील हंदिनागुर गावात घडली. 32 वर्षीय अव्वम्मा श्रीशैल गुब्बेवाड असे आत्महत्या केलेल्या या महिलेचे नाव आहे. तिने आपल्या दोन मुलींना आधी विहिरीत ढकलून देऊन स्वतःही विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. अव्वम्मा ही गेल्या सहा महिन्यांपासून मानसिक नैराश्याने ग्रस्त होती अशी माहिती उपलब्ध झाली आहे.
अव्वम्माला एकूण चार मुली आहेत. पती श्रीशैल मेंढ्या चारण्यासाठी आणि दोन मुली शाळेत गेल्यावर तिने आपल्या 3 वर्षाच्या आणि 1 वर्षाच्या दोन मुलींना आधी विहिरीत ढकलून देऊन स्वतःही विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. देवरहिप्परगी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. गावकर्यांच्या मदतीने मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आले. मृतदेह शवविच्छेदनासाठी सिंदगी तालुका रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. देवरहिप्परगी पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta