मुख्यमंत्री बोम्मई, पावसाशी संबंधित घटनांमध्ये ३२ जणांचा मृत्यू
बंगळूर : राज्यात अलीकडच्या काळात पावसाशी संबंधित घटनांमध्ये ३२ लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी बुधवारी उडपी येथे पत्रकारांशी बोलताना दिली. राज्यभरात अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या सार्वजनिक पायाभूत सुविधा पुनर्संचयित करण्यासाठी राज्य सरकार ५०० कोटी रुपये जारी करेल, असेही ते म्हणाले.
पाच लोक अजूनही बेपत्ता आहेत. भूस्खलन आणि पुराच्या पार्श्वभूमीवर तीनशेहून अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे, असे ते पुढे म्हणाले.
मुख्यमंत्री म्हणाले, की पावसामुळे झालेल्या घटनांमध्ये ३४ जण जखमी झाले आहेत. १४ मदत शिबिरे उभारण्यात आली असून लोकांना पौष्टिक आहार मिळावा यासाठी त्यांना अंडी वाटली जात आहेत. जुलैमध्ये झालेल्या संततधार पावसाचा फटका किनारपट्टीच्या जिल्ह्यांना सहन करावा लागला आहे. दक्षिण कन्नड, उत्तर कन्नड, उडुपी आणि कोडगु या तीन किनारपट्टी जिल्ह्यामध्ये या वर्षी जुलैमध्ये अतिरिक्त पाऊस झाला आहे. उत्तर कर्नाटक जिल्ह्यातही अधिक पाऊस झाला आहे.
राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) चार तुकड्या कोडगू, बेळगाव, रायचूर जिल्ह्यात सेवेत रुजू झाल्या आहेत आणि राज्य आपत्ती निवारण दलाची (एसडीआरएफ) अनेक पथके बेळगाव, दक्षिण कन्नड, उत्तर कन्नड आणि उडुपी जिल्ह्यात काम करत आहेत, असे ते म्हणाले.
भूकंपांच्या कारणांचा अभ्यास
त्यांनी सांगितले की राज्य सरकारने कोडगू आणि दक्षिण कन्नड मधील भूकंप, किनारपट्टी आणि कोडगू जिल्ह्यातील भूस्खलन आणि समुद्राची धूप याबाबत एजन्सीना अभ्यास करण्याचे आदेश दिले आहेत.
कोडगू आणि किनारपट्टी प्रदेशात वारंवार होणाऱ्या भूकंप यांचा अभ्यास करण्यासाठी भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण (जीएसआय), नॅशनल जिओफिजिकल रिसर्च इन्स्टिट्यूट आणि बंगळूर आणि म्हैसूर विद्यापीठाने अभ्यास करण्यास आणि उपाय शोधण्यास सांगितले आहे.
अमृता विद्यापीठात भूस्खलनाचा अभ्यास करण्याच्या क्षेत्रातील तज्ञ आहेत आणि त्यांनी कोडगु जिल्ह्यात संशोधन हाती घेतले आहे. पश्चिम घाट क्षेत्राचा अभ्यास करण्याचे आदेश दिले जातील असे ते म्हणाले.
राज्याला ३३० किलोमीटर समुद्रकिनारा लाभला आहे. येथील समुद्राची धूप रोखण्यासाठी ३०० कोटी रुपये खर्च करण्यात आले असले तरी ही समस्या कायम आहे.
आमचे राज्य केरळ सरकारने लागू केलेले आधुनिक वेव्ह ब्रेकर तंत्रज्ञान लागू करेल. ते एक किलो मीटरसाठी प्रायोगिक तत्त्वावर लागू केले जाईल आणि नंतर संपूर्ण भागापर्यंत विस्तारित केले जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
पुढील आठवड्यात बेळगावला भेट
पुढील आठवड्यात कारवार, बेळगाव आणि उत्तर कर्नाटक जिल्ह्यांना भेट देणार असल्याचे मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले. दक्षिण कन्नड जिल्ह्यात पाच तर उत्तर कन्नड जिल्ह्यात तीन जणांचा पावसाशी संबंधित घटनामध्ये मृत्यू झाला असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर उडपी व दक्षिण कन्नड जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची त्यांनी माहिती दिली.
Belgaum Varta Belgaum Varta