बेंगळुर : कर्नाटकात मुदतपूर्व निवडणुकीचे वारे वाहू लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. एकंदर तीन्ही मोठ्या राजकीय पक्षाच्या वाढत्या कार्यक्रमांचा आलेख पाहता विधानसभा निवडणुका मुदतपूर्व होण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.
राज्याच्या विधानसभा निवडणुकीला नऊ महिने बाकी असताना राज्यातील सत्ताधारी भाजप, काँग्रेस, धजद सारख्या मोठ्या पक्षांच्या राजकीय हालचाली पाहता मुदतपूर्व निवडणुका होतील याला दुजोरा मिळत आहे.
24 एप्रिल 2023 ला विधानसभेचा कार्यकाळ संपणार आहे. मात्र वर्षाअखेरीस विविध राज्यातील विधानसभा निवडणुका होणार आहेत त्याचबरोबर कर्नाटकमधील विधानसभा निवडणुका घेण्याचा निर्णय भाजप नेत्यांनी घेतल्याचे समजते. राज्यातील तिन्ही राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत तर भाजप यावेळी कर्नाटकात एकहाती सत्ता आणण्याच्या प्रयत्नात आहे तर दुसरीकडे काँग्रेसने देखील भाजपकडून सत्ता हिसकावून घेण्यासाठी कंबर कसली आहे.
काँग्रेस आधीपासूनच विविध कार्यशाळा, मोर्चे या माध्यमातून ऍक्टिव्ह मोडमध्ये आल्याचे दिसून येत आहे. येत्या 3 ऑगस्ट रोजी देखील काँग्रेस शक्तिप्रदर्शन करण्याच्या तयारीत आहे. विरोधीपक्ष नेते सिद्धरामय्या यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सिद्धरामय्या यांनी एक कार्यक्रम आयोजित केला आहे मात्र हा कार्यक्रम वैयक्तिक नसून राजकीय असल्याचे विधान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी केले आहे. तर माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी डिसेंबरमध्ये विधानसभा निवडणुक होणार असल्याने कार्यकर्त्यांना निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले आहे.
एकंदर परिस्थिती पाहता कोणताही राष्ट्रीय पक्ष एप्रिल 2023 पर्यंत वाट पाहण्यासाठी तयार नसल्याचे दिसून येत आहे. भाजपचे केंद्रीय नेते देखील कर्नाटकात विधानसभा निवडणुक वेळेआधी घेण्याचा विचार करत आहेत. राज्यातील अंतर्गत सर्वेक्षणाने भाजपमध्ये एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे मुदतपूर्व निवडणुकीच्या हालचालींना वेग आला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta