मल्लिकार्जून खर्गेंचा राज्यातील नेत्याना सल्ला, कॉंग्रेसच्या दोन गटातील दाव्यावर नाराजी
बंगळूर :आगामी २०२३ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवारीवर चर्चा करणे योग्य नाही, त्यावर अंतिम निर्णय हायकमांडच घेईल, असे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी शनिवारी (ता. २३) सांगितले. मुख्यमंत्रीपदाबाबत कर्नाटक काँग्रेसमधील दोन गटात सुरू असलेल्या वादाच्या वृत्तावर ते म्हैसूर येथे प्रतिक्रिया व्यक्त करत होते.
प्रसार माध्यमांशी बोलताना खर्गे पुढे म्हणाले, की आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्रीपदासाठी दावा करणे योग्य नाही. म्हैसूर, बंगळूर किंवा गुलबर्ग्यामध्ये मुख्यमंत्री कोण व्हावा याचा निर्णय होणार नाही. पक्षाचे उच्चाधिकारी या प्रकरणी निर्णय घेतील.
विरोधी पक्ष नेते सिद्धरामय्या आणि कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी अनेकदा मुख्यमंत्रीपदासाठी दावा केला आहे. सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांचे समर्थक काँग्रेस पुन्हा सत्तेत आल्यास त्यांचा नेताच मुख्यमंत्री होईल, असा दावा करत आहेत.
या राजकीय घडामोडींमुळे काँग्रेसमधील अंतर्गत भांडण उघड झाले असून निवडणुका जसजशा जवळ येतील, तसतसा आगामी काळात हा वाद अधिकच चिघळणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. विधानसभा निवडणुकीला आता दहा महिन्याहून कमी कालावधी उरला आहे.
शिवकुमार आणि सिद्धरामय्या यांच्यासोबतच काँग्रेसमधील काही नेत्यांना मल्लिकार्जुन खर्गे यांनी बहुमत मिळाल्यास मुख्यमंत्री व्हावे असे वाटते.
सूत्रांचे म्हणणे आहे, की खर्गे म्हणाले की म्हैसूरमध्ये मुख्यमंत्री पदाचा निर्णय घेतला जाणार नाही कारण सिद्धरामय्या त्या ठिकाणचे आहेत आणि गुलबर्गा हे त्यांचे मूळ ठिकाण आहे.
ते पुढे म्हणाले काँग्रेस नेहमीच सामूहिक नेतृत्वाने पुढे गेला आहे. आताही सामूहिक नेतृत्वाखालीच निवडणुकाना सामोरे जायचे आहे. आम्हाला पक्षाला पुन्हा सत्तेत आणायचे आहे, हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे असे ते म्हणाले.
राज्याच्या राजकारणात परत कधी येणार याविषयी विचारले असता खर्गे म्हणाले, मला संधी देण्याचा निर्णय होतो का, ते प्रथम पहावे लागेल. पक्षांतर्गत सर्वेक्षणातून काँग्रेस पक्ष पुन्हा सहज सत्तेत येईल असा असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे त्यामुळे काँग्रेस नेते खुश आहेत.
व्यक्ती पूजा नको – शिवकुमार
राज्यातील नेतृत्वाच्या वादावरून काँग्रेसमधील कलह वाढला आहे. मुख्यमंत्री पदासाठी समर्थकाकडून उमेदवारी पुढे येऊ लागल्यानंतर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी शनिवारी सर्वाना आपली तोंड बंद ठेवून राज्यात प्रथम पक्षाची सत्ता आणण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
जर तुम्हाला पक्षाबद्दल खरा आदर असेल तर व्यक्तीची पूजा करणे सोडून द्या आणि पक्षाची पूजा करा. अधिकाधिक लोकांना पक्षाच्या पटलावर आणण्यावर भर द्या. सर्व नेत्यांनी आपापल्या समुदायांना संघटित करून कर्नाटकात काँग्रेसला सत्तेत आणूया, असे शिवकुमार म्हणाले.
काँग्रेसचे आमदार आणि सिद्धरामय्या यांचे निकटवर्तीय जमीर अहमद खान यांच्या विधानावर त्यांनी टीका केली, की वक्कलिग समाजापेक्षा मुस्लिम समाजाचे मतदार जास्त आहेत. तेही मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत. मुख्यमंत्रीपद आता रिक्त नाही. प्रत्येकाने तोंड बंद ठेवावे, मी हे सर्वांना सांगत आहे असे त्यांनी अधोरेखित केले.
शिवकुमार यांनी मुख्यमंत्री बनण्याची इच्छा व्यक्त करण्याच्या आपल्या विधानाचा बचाव केला.
कॉंग्रेस पक्षाच्या प्रचार समितीचे अध्यक्ष एम. बी. पाटील यांनी यापूर्वी सांगितले होते की ते शिवकुमार गट किंवा सिद्धरामय्या गट यापैकी कोणाचीही ते बाजू घेणार नाहीत, कारण त्यांची स्वतःची ओळख आहे. शिवकुमार यांचे विधान पक्षाच्या नेत्याच्या विरोधाभासी आहे, ज्यामुळे सध्याच्या परिस्थितीत आणखी गोंधळ उडाला आहे असे काँग्रेसमधील अंतर्गत सूत्रांनी सांगितले.