सिध्दरामोत्सवात कॉंग्रेसला साथ देण्याचे आवाहन
बंगळूरू : राज्यातील भाजप सरकार समाजातील शांतता आणि सलोखा नष्ट करत असून लोकांमध्ये फूट पाडत असल्याची टीका अखिल भारतीय कॉंग्रेस समितीचे नेते राहुल गांधी यांनी केली. माजी मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांच्या दावनगेरे येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
ते म्हणाले, की काँग्रेस सरकारच्या काळात सर्व समुदाय शांततेत आणि सुसंवादात राहत होते. कोणालाच भीती वाटली नाही. मात्र, सध्याच्या भाजप सरकारच्या काळात कर्नाटकात अशांतता आहे. कर्नाटकातील सलोख्याची चर्चा अमेरिकेत सुध्दा सुरू होती. आता राज्यात तो सर्वधर्म समभाव आणि सलोखा दिसत नाही, असे अमेरिकेतील नागरिक सांगत आहेत. भाजप सरकार राजकीय कारणांसाठी लोकांमध्ये फूट पाडत आहे, तर काँग्रेसने देशात एकोपा निर्माण केल्याचे ते म्हणाले.
राज्यातील जनतेच्या हितासाठी काम करणारे स्वच्छ आणि प्रामाणिक सरकार कॉंग्रेस देईल, अशी ग्वाही राहूल गांधी यांनी दिली. राजीव गांधी यांनीच कर्नाटकला बंगळूर आणि अमेरिकेला जोडणाऱ्या संगणकाच्या (आयटी क्षेत्र) आंतरराष्ट्रीय नकाशावर आणले होते, असे त्यांनी सांगितले.
कोणत्याही उद्योग, व्यवसायाच्या यशासाठी शांतता महत्त्वाची असते. मात्र, सध्याच्या भाजप सरकारची जनजीवनाशी बांधिलकी नाही. मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असून बसवण्णांच्या तत्वाविरुद्ध कारभार केला जात आहे. नोटाबंदी हे केंद्र सरकारचे महान कार्य! परंतु त्यामुळे लघु व मध्यम उद्योग उद्ध्वस्त झाले. नोटाबंदी आणि जीएसटीच्या नावाखाली त्यांनी देशाची फसवणूक केली. कामगार व शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त करून काहींना वाचवणे हा त्यामागचा उद्देश असल्याचे ते म्हणाले.
सिद्धरामय्या यांच्या कार्यकाळात क्षीरभाग्य, अन्नभाग्य, इंदिरा कॅन्टीनसह अनेक प्रकल्प राबवून राज्याला विकासाच्या वाटेवर नेले. कर्नाटकची भाषा, संस्कृती आणि जीवन याबद्दल एकमत आहे. कर्नाटकच्या संस्कृतीचे जतन आणि विकास करण्यासाठी लोकांचे आशीर्वाद खूप महत्वाचे आहेत. सिद्धरामय्या आणि डी. के. शिवकुमार यांच्या नेतृत्वाखाली राज्यात काँग्रेसचे सरकार पुन्हा सत्तेत आणण्याचे आवाहन राहुल गांधी यांनी जनतेला केले.
केपीसीसीचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी भाषण केले. सिद्धरामय्या हे केवळ मागासवर्गीयांचे नेते नाहीत तर ते सर्व जाती आणि धर्मांचे नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली काम करूया, भ्रष्ट भाजप सरकारपासून मुक्ती मिळवूया, असे ते म्हणाले. यासाठी जनतेने एकत्र येऊन काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.
भाजपकडून द्वेषाचे राजकारण – सिध्दरामय्या

भाजप केंद्र आणि राज्यात द्वेषाचे राजकारण करत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी केला आहे. भाजपचे ध्येय हिंदू राष्ट्र निर्माण करणे आहे. काँग्रेसला कोणीही संपवू शकत नाही. काँग्रेस संपवण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण होणार नाही, या देशातील जनता देशाची घटना बदलू देणार नाही, असा टोला त्यांनी पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्यावर फोडला.
पंतप्रधानपद नाकारणाऱ्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याविरोधात भाजप द्वेषाचे राजकारण करत आहे. ते म्हणाले की, कोणतीही बेकायदेशीर सावकारी झाली नसली तरी ईडीकडून तपास सुरू आहे.
सिद्धरामय्या यांनी दक्षिण कन्नड जिल्ह्यात झालेल्या हत्याकांडाचा उल्लेख करून मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केवळ प्रवीणच्या कुटूंबियांनाच नुकसान भरपाई का दिली. मसूद आणि फाजील कुटुंबाला नुकसान भरपाई का दिली नाही असा सवाल केला. बोम्मई हे मुख्यमंत्री एका धर्माचे आहेत का? मुख्यमंत्रीपदी राहण्यासाठी तुम्हाला कोणती नैतिकता ठेवावी लागेल? नालायक असलेल्यांनी राज्यावर राज्य करण्याऐवजी राजीनामा देऊन घरी जावे, अशी त्यांनी मागणी केली.
जनतेच्या पाठिंब्याशिवाय कोणीही राजकारणात जास्त काळ राहू शकत नाही. मी ४४ वर्षांपासून जनतेच्या पाठिंब्याशिवाय कोणीही राजकारणात जास्त काळ राहू शकत नाही. मी ४४ वर्षांपासून राजकारणात आहे. मी आमदार, मंत्री, उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री म्हणून काम केले असून मला ही संधी दिल्याबद्दल मी संपूर्ण कर्नाटकचे आभार मानतो. जोपर्यंत शक्ती आहे तोपर्यंत राजकारण करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Belgaum Varta Belgaum Varta