बंगळूर : मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी शनिवारी सायंकाळी राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारा संपर्क साधून पूर परिस्थिती बाबत चर्चा केली. पूरग्रस्तांना तातडीने मदत करण्याच्या त्यांनी सूचना केल्या. बैठकीत पावसामुळे झालेल्या नुकसानीची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी राज्य नैसर्गिक आपत्ती निवारण निधी अंतर्गत २०० कोटी रुपये मंजूरीचा आदेश दिला.
बेळ्ळारी, चित्रदुर्ग, धारवाड, गदग, हावेरी, उत्तर कन्नड, चामराजनगर जिल्ह्यांसाठी प्रत्येकी पाच कोटी, चिकमंगळूर, कोप्पळ, मंड्या, रायचूर, शिमोगा, तुमकूर जिल्ह्यांसाठी प्रत्येकी १० कोटी, दावणगेरे, गदग, म्हैसूर जिल्ह्यांसाठी प्रत्येकी १५ कोटी व दक्षिण कन्नड जिल्ह्याला २० कोटी रुपयांसह एकूण २०० कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे.
निधीच्या वापरात काही त्रुटी आढळल्यास संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना थेट जबाबदार धरण्यात येईल, असा इशारा या आदेशात देण्यात आला आहे.
बुधवारी मंत्रीमंडळ बैठकीत चर्चा
राज्यभरात अतिवृष्टीमुळे शेती, रस्ते आणि इतर पायाभूत सुविधांचे मोठ्या प्रमाणावर नुकसानीमुळे झालेल्या समस्या सोडवण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी १० ऑगस्ट रोजी (बुधवारी) राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे.
जूनच्या पहिल्या आठवड्यापासून ते १६ जुलैदरम्यान ५,७७१ हेक्टर शेतजमीन आणि १६ जुलै ते ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यादरम्यान १०,९८४ हेक्टर शेतजमिनीचे पावसाने आणि पुरामुळे नुकसान झाले, असे राज्यव्यापी पर्जन्य सर्वेक्षण पथकांनी म्हटले आहे.
या वर्षी सुमारे ३७० भूस्खलन झाले आहेत, अंदाजे ३,६०० किमी रस्ते आणि ६५० पूल खराब झाले आहेत, १६ हजार घरांचे नुकसान झाले आहे, ४०० हून अधिक गुरे मरण पावली आहेत, असे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा पायाभूत सुविधा दलांनी जारी केलेल्या अहवालात म्हटले आहे.
मंत्री गोविंद कारजोळ यांनी माहिती दिली आहे की, जिल्हा आणि तालुका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी पूरग्रस्त भागातून बाधित लोकांना शाळा आणि महाविद्यालयांसारख्या सरकारी संस्थांमध्ये हलवले आहे.
आपत्ती व्यवस्थापन आयुक्त मनोज राजन यांनी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे निरीक्षण केले आहे. अनेक सरकारी कार्यालये, शाळा आणि अंगणवाड्यांचे नुकसान झाल्याचे अहवालात म्हटले आहे. पण खरी संख्या जास्त असू शकते, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
Belgaum Varta Belgaum Varta