बेंगळुरू : कर्नाटकातील लिंगायत समाजाच्या चित्रदूर्ग मठाचे प्रमुख शिवामूर्ती मुरघा शरानारू यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चित्रदुर्ग जिल्हा कारागृहात न्यायालयीन कोठडीत असताना छातीत दुखू लागल्याच्या तक्रारीनंतर शिवामूर्तींवर सध्या रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. दोन अल्पवयीन मुलींनी शिवामूर्ती यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. या प्रकरणी त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
शिवामूर्तींना गुरुवारी रात्री साडेअकराच्या सुमारास अटक करण्यात आली होती. त्यानंतर चित्रकुट जिल्हा न्यायालयामध्ये हजर करण्यात आल्यानंतर रात्री साडेतीन वाजता येथील कारागृहात त्यांची रवानगी करण्यात आली होती. त्याआधी त्यांच्याविरोधात पोलिसांनी लूक आऊट नोटीस जारी केली होती.
शिवामूर्ती यांच्याविरोधात दोन अल्पवयीन मुलींनी म्हैसूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनंतर शिवामूर्तींविरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चित्रदूर्ग मठ संचालित एका शाळेतील दोन मुलींनी १ जानेवारी २०१९ ते ६ जून २०२२ यादरम्यान शिवामूर्तींनी लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर पोलिसांकडून मठाधीशाविरोधात ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, हे आपल्या विरोधात रचलेलं कटकारस्थान आहे. याप्रकरणात लवकरच निर्दोषत्व सिद्ध करु, असे शिवामूर्ती यांनी म्हटलं आहे.
Belgaum Varta Belgaum Varta