सभागृहाचे कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब
बंगळूर : बीएमएस सार्वजनिक शिक्षण विश्वस्थ घोटाळ्यात उच्च शिक्षण मंत्री डॉ. सी. एन. अश्वथनारायण यांचा हात आहे. यासाठी त्यांनी राजीनामा द्यावा आणि सीबीआय किंवा सीओडी मार्फत चौकशी करावी, अशी मागणी करत धजदच्या सदस्यांनी आजही विधानसभेत ठिय्या मांडला, त्यामुळे सभागृहात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. परिणामी कोणतेही कामकाज न होता सभागृहाचे कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आले.
धजद सदस्यांचे आंदोलन मागे घेण्यात यावे यासाठी विधानसभाध्यक्ष विश्वेश्वर हेगडे कागेरी यांनी सत्ताधारी व विरोधी पक्ष नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीत चौकशी करण्याची मागणी सरकारी पक्षाने मान्य केली नाही आणि धजदनेनेही आपला आग्रह सोडला नाही. त्यामुळे वाटाघाटींची बैठक फलदायी ठरली नाही. परिणामी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सुरळीत कामकाज झाले नाही. प्रचंड गदारोळामुळे सभागृह अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आले.
सभागृह सुरू होताच धजद सदस्यांनी सभागृहात आपले ठिय्या आंदोलन पुढे चालूच ठेवले आणि बीएमएस शैक्षणिक संस्था घोटाळ्याच्या चौकशीच्या मागणीसाठी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. सभापती विश्वेश्वर हेगडे कागेरी यांनी धजदला आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले, परंतु धजदने ते मान्य केले नाही.
या गदारोळात कुमारस्वामी म्हणाले की, चौकशी झाली पाहिजे, या भूमिकेपासून मागे हटण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, तेव्हा विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या म्हणाले की हे प्रकरण गंभीर आहे. धजदने धरणे आंदोलन सुरू केल्यामुळे आम्ही बोलू शकत नाही. १० मिनिटांसाठी सभागृह तहकूब करा, तुमच्या दालनात बैठक बोलावा आणि वाटाघाटी करा, असा सल्ला त्यांनी दिला.कायदा आणि संसदीय कामकाज मंत्री मधुस्वामी यांनी याला सहमती दर्शवताच, सभापतींनी सभागृहाचे कामकाज १० मिनिटांसाठी तहकूब केले आणि सभागृहातील विविध पक्षांच्या नेत्यांना बैठकीला उपस्थित राहण्याची विनंती केली.
सभापतींच्या दालनात अर्ध्या तासाहून अधिक वेळ बैठक चालली. वाटाघाटी होऊनही धजदने चौकशीची मागणी मागे घेतली नाही. सरकार चौकशी न करण्याच्या निर्णयावर ठाम राहिल्याने वाटाघाटी अयशस्वी झाल्या. दुपारी १२ वाजता सभागृह पुन्हा बोलावले असता, धजदच्या सदस्यांनी आंदोलन सुरूच ठेवले आणि निषेधाच्या घोषणा दिल्या. त्यांनी मंत्री अश्वथनारायण यांच्या राजीनाम्याची मागणी करणारे फलक लावून धरणे सुरूच ठेवले.
सभापती कागेरी यांनी त्यांना धरणे थांबवण्याचे आवाहन केले, मात्र धजदने ते मान्य केले नाही आणि त्यांनी सभागृहात घोषणाबाजी केली. त्यामुळे सभागृहात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. या गोंधळातच बोलताना कुमारस्वामी म्हणाले, की बीएमएस एज्युकेशन ट्रस्टच्या गैरव्यवहाराची सीबीआय किंवा सीओडी मार्फत चौकशी झाली पाहिजे. आमच्या पक्षाची हीच भूमिका आहे.
यावर मंत्री अस्वथनारायण म्हणाले की, धजदने केलेले आरोप खोटे आणि निराधार आहेत. सर्व काही कायद्यानुसार आहे. माझी बदनामी करण्यासाठी आरोप करण्यात येत आहेत. चौकशी करण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
परंतु धजद सदस्यांनी घोषणाबाजी सुरूच ठेवली. त्यामुळे सभागृहातील गदारोळ आणखीनच वाढला. विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या म्हणाले, आम्ही आम्हाला ४० टक्के कमिशनवर बोलायचे आहे. परंतु धजदच्या आंदोलनामुळे ते शक्य नाही. यासाठी अधिवेशन सोमवारी चालू ठेवावे.
परंतु सरकारने याला सहमती दर्शवली नाही, त्यानंतर मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि सिद्धरामय्या यांच्यात ४० टक्के कमिशनवरून जोरदार वाद झाला. या मुद्द्यावरून गदारोळ झाल्याने सभागृहात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. या गदारोळात सभापतींनी प्रश्नोत्तराच्या सत्रात लक्षवेधी सूचना मांडून उत्तरे सादर केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी एस.सी, एसटी आरक्षणाबाबत गदारोळात निवेदन वाचले. त्यानंतर सभापतींनी नवरात्रीच्या शुभेच्छा देऊन सभागृहाचे कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब केले.
Belgaum Varta Belgaum Varta