राहूल गांधी, बदनावलू गावात गांधी जयंतीत सहभाग
बंगळूर : महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त रविवारी (ता. २) भारत जोडो यात्रेवर असलेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हत्येचा मुद्दा उपस्थित केला आणि विचारधारांची लढाई सुरू असल्याचे सांगितले. या लढ्यात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.
राहुल गांधी म्हणाले, गांधीजीनी ज्याप्रमाणे ब्रिटिश राजवटीशी लढा दिला त्याचप्रमाणे आज आपण गांधीजींची हत्या करणाऱ्या विचारधारेशी लढा देत आहोत. या विचारसरणीने गेल्या आठ वर्षात असमानता, फुटीरता यामुळे आपल्या कष्टाने मिळविलेल्या स्वातंत्र्याचा ऱ्हास झाला आहे.
१९२७ मध्ये महात्मा गांधीनी भेट दिलेल्या कर्नाटकातील बदनावलू खादी उद्योग केंद्राला त्यांनी आपल्या भारत जोडो यात्रे दरम्यान आज भेट दिली.
रविवारी प्रसारमाध्यमांना दिलेल्या निवेदनात राहुल गांधी म्हणाले, की आम्ही भारताच्या त्या महान पुत्राचे स्मरण करतो आणि त्यांना आदरांजली अर्पण करतो. आपण भारत जोडो यात्रेच्या २५ व्या दिवशी आहोत. या यात्रेत आपण त्यांच्या अहिंसा, समता आणि न्यायाच्या मार्गावर चालत आहोत. या वस्तुस्थितीमुळे महात्माजींचे स्मरण अधिक मार्मिक झाले आहे.
हिंसा आणि असत्याच्या या राजकरणा विरोधात भारत जोडो यात्रा कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत अहिंसा आणि स्वराज्याचा संदेश देईल, असे ते पुढे म्हणाले.
राहुल म्हणाले, स्वराज्याचे अनेक अर्थ आहेत. भीतीपासून मुक्तता हेच आपले शेतकरी, तरुण आणि लघू व मध्यम उद्योजकांना हवे आहे. आपल्या राज्यांना संविधानिक स्वातंत्र्य वापरण्याचे स्वातंत्र्य आहे. आपल्या गावांना पंचायत राज्य चालवण्याचेही स्वातंत्र्य आहे.
३,६०० किलोमीटर पायी प्रवास करणारे भारत यात्री असोत किंवा आपल्या सोबत कमी कालावधीसाठी चालणारे लाखो नागरिक असो, ही विजययात्रा भीती, द्वेष विभाजनाच्या राजकारणाविरुद्ध जनतेचा शांत आणि दृढनिश्चयी आवाज आहे. सत्तेत असलेल्यांना गांधीजींचा वारसा समर्पक करणे सोयीचे असेल, पण त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालणे त्याहून कठीण आहे.
यात्रेत मोठ्या संख्येने पुरुष, महिला आणि मुले आधीच सहभागी झाली आहेत. गांधीजींनी ज्या मूल्यांसाठी आपले प्राण दिले, ते आपले संविधानिक हक्क आज धोक्यात आले आहेत, असे अनेकांचे मत आहे.
आम्ही म्हैसूर ते काश्मीर प्रवास करत असताना मी भारतातील माझ्या सहकारी नागरिकांना अहिंसा आणि सद्भावनेच्या भावनेने आमच्याबरोबर चालण्याची विनंती करतो, असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.
गांधी जयंतीत सहभाग
गांधी जयंतीच्या पार्श्वभूमीवर, राहुल गांधी यांनी राज्य काँग्रेस नेत्यांसह रविवारी म्हैसूर जिल्ह्यातील नंजनगुडू तालुक्यातील बदनावलू गावातील ग्रामोद्योग केंद्राला भेट दिली. गांधी जयंतीच्या पार्श्वभूमीवर सकाळी भारत जोडो पदयात्रेला विश्रांती देण्यात आली. राहुल गांधींसह काँग्रेसचे नेते सकाळी साडेसात ते दुपारी तीन या वेळेत बदनावलू येथील गांधी जयंती कार्यक्रमात सहभागी झाले.
काही ठिकाणी साफसफाईची कामे केल्यानंतर त्यांनी खादी ग्रामोद्योगाशी संबंधितांशी संवाद साधला. नंजनगुड येथील श्रीकंठेश्वर मंदिराला त्यांनी भेट दिली.
Belgaum Varta Belgaum Varta