वडीलांचे कर्ज फेडण्यासाठी अल्पवयीन मुलावर सक्ती, एफआयआर दाखल
बंगळूर : वडिलांनी कर्जाची परतफेड न केल्यामुळे एका १५ वर्षीय मुलाला ‘बेतालू सेवे’ (नग्न पूजा) हा विधी करण्यास भाग पाडण्यात आले आणि त्याचा व्हिडिओ व्हायरल केल्याची घटना समोर आली आहे. राज्यात ‘बेतालू सेवे’वर बंदी आहे.
या वर्षी जूनमध्ये बंगळुरपासून सुमारे ३५० किमी अंतरावर असलेल्या कोप्पळ गावात हा भयानक विधी झाला. मात्र, नुकताच या ‘विधीचा’ व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हे समोर आले आहे.
दोन ऑक्टोबर रोजी कोप्पळ ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये असे म्हटले आहे की, या प्रकरणात आरोपी म्हणून नाव असलेल्या व्यक्तीने मुलाचे कपडे फाडले आणि व्हिडिओ शूट केला.
पोलिसांनी सांगितले की, आरोपीने पीडिताच्या वडिलांना घर बांधण्यासाठी कर्ज दिले होते. परंतु मुलाचे वडील कर्जाची रक्कम फेडण्यास असमर्थ होते. बदल्यात, आरोपीने हुबळी येथे रोजंदारीवर काम करणाऱ्या मुलाला ‘बेतालू सेवे’मुळे त्याच्या वडिलांना कर्जमुक्त करण्यात मदत होईल असे पटवून विधी करण्यासाठी नेले.
मुलाने त्या व्यक्तीवर विश्वास ठेवला आणि होकार दिला. पीडितेच्या म्हणण्यानुसार, तो आरोपींसोबत तिम्मसागर गावातील जल जीवन मिशनमध्ये पाइपलाइन टाकण्याच्या कामासाठी हुबळी येथे गेला होता. वडिलांच्या कर्जातून मुक्त होण्यासाठी पैसे जमा करण्यासाठी तो वेगवेगळ्या शहरांमध्ये काम करत असताना, आरोपींनी त्याला विधी करण्यास राजी केले. त्यानंतर मुलगा मंगळुरला एका खासगी बांधकाम साइटवर काम करण्यासाठी गेला.
‘विधी’चा व्हिडिओ व्हायरल झाल्याने पालकांना धक्काच बसला. त्यांनी गावाची झाडाझडती घेतली, पण विधीमागे असणारे लोक सापडले नाहीत. अखेर कुटुंबीय पोलिसांकडे गेले. फरार झालेल्यांच्या शोधासाठी पोलिसांचे पथक तयार करण्यात आले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta