Sunday , July 26 2026
Breaking News

भारत जोडो यात्रेत सोनिया गांधी, प्रियांका सहभागी होणार

Spread the love

 

कार्यकर्त्यांचा उत्साह दुणावला, सोनिया गांधींचे म्हैसुरात आगमन

बंगळूर : अखिल भारतीय काँग्रेस कमिटी (एआयसीसी) नेत्या सोनिया गांधी यांचे सोमवारी (ता. ३) म्हैसूर विमानतळावर आगमन झाले. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रेत त्या गुरूवारी (ता.६) सामील होणार आहेत. दरम्यान, कॉंग्रेस नेत्या प्रियांका गांधीही शुक्रवारी (ता. ७) कर्नाटकात येत असून त्याही पदयात्रेत सहभागी होणार असल्याची माहिती काँग्रेसच्या सूत्रांनी दिली.
कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीचे (केपीसीसी) प्रमुख डी. के. शिवकुमार, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, एआयसीसी सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल आणि रणदीप सिंग सुरजेवाला आणि पक्षाच्या इतर नेत्यांनी म्हैसूरच्या विमानतळावर सोनिया गांधींचे स्वागत केले.
दरम्यान, म्हैसूरहून निघालेल्या भारत जोडो यात्रेला सोमवारी दुपारी श्रीरंगपट्टण येथे ४ आणि ५ ऑक्टोबरला दोन दिवस विश्रांती देण्यात आली आहे. पक्षाच्या नेत्यांनी सांगितले की सोनिया गांधी सहा ऑक्टोबर रोजी यात्रेत सामील होण्यापूर्वी दोन दिवस कोडगू येथे राहतील.
आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या भारत जोडो यात्रेत काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि प्रियांका गांधी सहभागी होणार असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे.
आगामी निवडणुकीची तयारी केलेल्या काँग्रेसला या दोघी पदयात्रेत पाऊल ठेवत असल्यानं नवसंजीवनी मिळणार आहे. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी गुरूवारी मंड्या जिल्ह्यातील पांडवपूर येथे भारत जोडो यात्रेत सामील होतील. प्रियांका गांधी सात ऑक्टोबर रोजी राज्यात येणार असून नागमंगल येथील यात्रेत सहभागी होतील.
सोनिया गांधी यांचे एका विशेष विमानाने म्हैसूर येथे आगमन झाल्यानंतर त्या हेलिकॉप्टरने कोडगूला गेल्या.
भारत जोडो यात्रेचे नेतृत्व करत असलेले राहुल गांधी चौथ्या दिवसाची भारत जोडो यात्रा पांडवपूरमध्ये संध्याकाळी संपल्यानंतर कोडगू रिसॉर्टमध्ये जातील, जिथे सोनिया गांधी मुक्काम करत आहेत.
उद्या भारत जोडो यात्रेला सुट्टी आहे आणि परवा आयुधपूजा, विजयादशमी आहे. दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर भारत जोडो यात्रा गुरूवारी मंड्या जिल्ह्यातील पांडवपूर येथून पुढे सुरू राहणार आहे. त्या दिवशी सोनिया गांधी पदयात्रेत सहभागी होणार असल्याने कार्यकर्त्यांचाही सहभाग वाढण्याची शक्यता आहे.
दुसऱ्या दिवशी प्रियांका गांधी राज्यात येणार आहेत. शुक्रवारी (ता. ७) मंड्या जिल्ह्यातील नागमंगला येथे होणाऱ्या भारत जोडो यात्रेत त्या सहभागी होणार आहेत.

दि. ५ रोजी बैठक
कोडगु रिसॉर्टमध्ये सोनिया गांधी उद्या दि. ५ रोजी एआयसीसी अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत राहुल गांधींशी चर्चा करणार आहेत. या बैठकीत अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवणारे मल्लिकार्जुन खर्गे, एआयसीसीचे सरचिटणीस वेणुगोपाल यांच्यासह अनेक महत्त्वाचे नेते सहभागी होणार आहेत.
एआयसीसी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत खर्गे यांच्या विजयाच्या रणनीतीबाबत बैठकीत चर्चा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

About Belgaum Varta

Check Also

26 दिवसांनंतर सोनम वांगचुक यांचे उपोषण मागे; केंद्र सरकारच्या आश्वासनानंतर निर्णय

Spread the love  नवी दिल्ली : नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई आणि परीक्षा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *