कॉंग्रेसच्या भारत जोडो यात्रेला शह देण्याचा प्रयत्न
बंगळूर : स्वबळावर राज्यात पुन्हा सत्ता मिळवण्याची रणनीती आखत असलेला सत्ताधारी भाजप मुख्यमंत्री बसवराज बोम्मई व माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखाली उद्या (ता. ११) पासून राज्यभर आयोजित दौर्याद्वारे विधानसभा निवडणुकीची घंटा वाजवणार आहे. राहूल गांधी यांच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेसच्या भारत जोडो पदयात्रेला शह देण्यासाठी भाजपने या जनसंकल्प यात्रेचे आयोजन केले असल्याचे मानण्यात येत आहे.
राज्यातील रायचूर जिल्ह्यातील गिलेसुगुर गावातून सुरू होणाऱ्या या यात्रेसाठी भाजपचे ५० हजार कार्यकर्ते आणि इतर लोकांना सहभागी करून घेण्याची योजना आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष नळीनकुमार कटील आणि भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंह यांच्या नेतृत्वाखालील दोन पथके राज्याचा दौरा सुरू ठेवणार आहेत. डिसेंबरच्या अखेरीस १६५ विधानसभा मतदारसंघ कव्हर करण्याची पक्षाच्या नेत्यांची योजना आहे.
विधानसभा मतदारसंघांना भेटी देताना बोम्मई आणि येडियुरप्पा सभांना संबोधित करतील. दरम्यान, ते राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनांच्या लाभार्थ्यांची भेट घेणार असून बूथ स्तरावरील भाजप कार्यकर्त्यांच्या बैठका घेणार आहेत. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशीही ते संवाद साधणार आहेत.
राज्यातील भाजप नेते विधानसभा मतदारसंघांना भेट देत असल्याने विविध मतदारसंघांवर लक्ष केंद्रित करून अनेक मेळावे होत आहेत. पक्ष ३० ऑगस्टला गुलबर्गा येथे ओबीसी मेळावा आणि नोव्हेंबरमध्ये बेळ्ळारी जिल्ह्यात एसटी अधिवेशन आयोजित करणार आहे.
म्हैसूर येथे अनुसूचित जाती-जमातींचा मेळावा, हुबळी येथे रयत मेळावा, बंगळुर येथे महिला मोर्चाचा मेळावा आणि मंगळूर येथे युवामोर्चाचा मेळावा डिसेंबरमध्ये होणार आहे. जातीच्या नेत्यांच्या भेटी, मठ आणि मंदिरांना भेटी आणि शेतात लाभार्थ्यांच्या बैठका घेतल्या जातील.
सात महामेळावे
भाजपने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सात ठिकाणी महामेळावे घेण्याचा निर्णय घेतला आहे. म्हैसूरमध्ये एससी मेळावा, गुलबर्गामध्ये ओबीसी मेळावा, हुबळीमध्ये शेतकरी मेळावा, बेळ्ळारीमध्ये एसटी मेळावा, मंगळूरमध्ये युवा मेळावा आणि बंगळुरमध्ये महिला मेळावा.
निवडणुकीत तिकीट देताना सर्वेक्षण अहवाल आणि तळागाळातील अहवालाच्या आधारे तिकीट निश्चित होणार असल्याची माहिती आहे. मात्र भाजपच्या उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले की, वरिष्ठ नेत्यांमध्ये मतदारसंघ बदलण्याची कोणतीही योजना नाही.
धजदची पंचरत्न यात्रा
राज्यातील आनखी एक प्रमुख राजकीय पक्ष धर्म निरपेक्ष जनता दल (धजद) एक नोव्हेंबरला राज्यात पंचरत्न यात्रा काढणार आहे. २०२३ मध्ये होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्ष सज्ज झाले आहेत. सत्ताधारी भाजपला हिंदुत्वाच्या अजेंड्यावर सत्ता टिकवायची आहे, तर विरोधी कॉंग्रेस सत्ताविरोधी घटकावर अवलंबून आहे. धजदला किंगमेकर बनण्यासाठी जास्तीत जास्त जागा जिंकायच्या आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta