बेळगाव : नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबद्दल चुकीची माहिती पसरविण्यात येत असून नवे शिक्षण धोरण सर्वांसाठी फायद्याचे असल्याचे मत कर्नाटकचे उच्च शिक्षण मंत्री अश्वथ नारायण यांनी व्यक्त केले.
बेळगावमधील केएलईएस संस्थेच्या कॅम्पसमधील जिरगे हॉलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी नव्या शैक्षणिक धोरणाबद्दल चुकीची माहिती पसरविण्यात येत असल्यासंदर्भात त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.
देशात नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या शैक्षणिक धोरणानुसार शिक्षण विभागातील अनेक सुविधा काढून टाकल्या जातील, अशी अफवा पसरविण्यात येत आहे. तसेच दलित आणि शोषित समाजाच्या आरक्षणाच्या सुविधाही रद्द करण्यासंदर्भात चुकीची माहिती पसरविण्यात येत आहे. परंतु नव्या शैक्षणिक धोरणात अशापद्धतीच्या कोणत्याही गोष्टी नसून, सहाव्या वर्षी सुरु होणारे औपचारिक शिक्षण तिसर्या वर्षांपासून सुरु करण्यात आल्यामुळे शिक्षणात सुधारणा होईल, असे मत अश्वथ नारायण यांनी व्यक्त केले. यानंतर शिक्षण व्यवस्थेच्या विकासासंदर्भात बोलताना ते म्हणाले की, जोपर्यंत शिक्षण क्षेत्रात बदल होत नाहीत, तोपर्यंत समाजात दर्जेदार जीवन जगण्याची वृत्ती येणे शक्य नाही. उत्तम सुविधा आणि संसाधनांसह आम्ही शिक्षण क्षेत्राला बळ देण्याचा प्रयत्न करीत आहोत. शैक्षणिक व्यवस्था मजबूत करून सर्वांना ऊर्जा देण्याचा आमचा मानस आहे. यामुळे सर्वांनी सरकारवर विश्वास ठेऊन सहकार्य करावे, असे आवाहन उच्च शिक्षणमंत्री अश्वथ नारायण यांनी केले. या कार्यक्रमाला विधानपरिषदेचे मुख्य सभासद महांतेश कवटगीमठ, विधानपरिषद सदस्य अरुण शहापूर, हनुमंत निराणी, प्रो. रामचंद्रगौडा, आर. एल. एस. कॉलेजच्या प्राचार्या डॉ. ज्योती कवळेकर, बसवराज वैद्यशाली यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
Check Also
न्यायालयाच्या आवारात वकिलांना सुरक्षा द्या : बेळगाव बार असोसिएशनची मागणी
Spread the love बेळगाव : तामिळनाडूमध्ये, न्यायालयाच्या आवारात एका वकिलावर पहाटेच्या सुमारास जीवघेणा हल्ला झाला …