बंगळूर : “बंगळुरमध्ये मंगळवारी (ता. ११) एका इमारतीचे छत कोसळून दोन जण ठार तर तीन गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.
बंगळुरच्या महादेवपूर येथील हुडीजवळ मंगळवारी सकाळी इमारतीचे छत खाली कोसळल्याने दोन मजुरांचा जागीच मृत्यू झाला. तसेच तीन जण गंभीर जखमी झाले असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
२७ वर्षीय अरमान आणि ३८ वर्षीय जैनुद्दीन अशी मृत मजुरांची नावे असून दोघेही मूळचे बिहारचे आहेत, असे पोलिस सूत्रांनी सांगितले.
महादेवपूर येथील ग्रॅफाइट इंडियाजवळील एका खासगी कंपनीची इमारत रिकामी करण्याचे काम सुरू होते. बाहेर काढण्यासाठी नेमलेले अरमान आणि जैनुद्दीन इमारतीत झोपले होते. रात्री पाऊस पडत असल्याने सर्वजण खाली झोपले होते. पहाटे पाचच्या सुमारास इमारतीचे छत अचानक कोसळले आणि दोन कामगारांचा जागीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने इमारतीत धाव घेतली आणि अन्य तीन कामगारांना रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी महादेवपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta