बंगळूर : राज्यातील पुरामुळे नुकसान झालेल्या घरे आणि पिकांना मदतीचे वाटप समाधानकारक नाही, असे म्हणत मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी जिल्हाधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली. जबाबदारी ओळखून काम करण्याच्या त्यांनी अधिकाऱ्यांना सक्त सूचना केल्या.
विधानसौध येथील कॉन्फरन्स हॉलमध्ये झालेल्या जिल्हाधिकीऱ्यांच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना ते म्हणाले की, अपेक्षित प्रमाणात उपाययोजना हाती घेण्यात आलेली नाही. त्यामुळे सरकारच्या विश्वासार्हतेवर परिणाम होईल. जिल्हाधिकाऱ्यांनी तालुका कार्यालयाला भेट देऊन पात्र लाभार्थ्यांना शासकीय लाभ मिळतील याची खात्री करावी. मात्र जिल्हाधिकारी कार्यालयातून बाहेर पडत नसल्याचे सांगून त्यांनी संताप व्यक्त केला.
मुख्यमंत्र्यांनी घराचे नुकसान आणि पिकांच्या नुकसानीच्या भरपाई व्यतिरिक्त नुकत्याच आढळलेल्या गुरांच्या लंपी या कातडीच्या गाठी रोगाच्या नियंत्रणासाठी केलेल्या उपाययोजना आणि नुकसान भरपाईचे वितरण याबाबत जिल्हानिहाय माहिती घेतली.
घर व पीक नुकसान भरपाईचे सर्वेक्षण करण्यासाठी ऑक्टोबर अखेरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. तोपर्यंत पात्र लाभार्थ्यांची नावे वेबपोर्टलवर जोडण्याची परवानगी देण्यात आली आहे.
त्यामुळे विलंब न करता पूर, अतिवृष्टी आणि पावसाच्या नुकसानीचे सर्वेक्षण करावे. जिल्हाधिकाऱ्यांनी तालुका कार्यालयाला भेट देऊन प्रशासनाला गती द्यावी, अशी सूचना केली.
अर्थसंकल्पासह शासकीय योजना व कार्यक्रमांच्या अंमलबजावणीच्या प्रगतीची जिल्हानिहाय माहितीही मुख्यमंत्र्यांनी घेतली व सूचना केल्या. जिल्हाधिकाऱ्यांनी वेळीच निर्णय घेऊन लोकांना मदत करावी. वक्तशीरपणा आणि कर्तव्यदक्षतेने काम करावे, असे निर्देश त्यांनी दिले.
जिल्हाधिकारी म्हणून काम करणे ही आयएएस अधिकाऱ्यासाठी खूप महत्त्वाची संधी असते. तुम्ही जिल्ह्यात पाऊल कसे टाकता हे महत्त्वाचे आहे. आता अनेक अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी पदाचा केवळ सत्तेचा भाग दिसतो. त्या पदाची जबाबदारी आणि प्रशासनावर होणारा परिणाम विचारात घेतला जात नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.
अधिकार गाजविणे वेगळे, शासन करणे वेगळे. हे लक्षात घेऊन काम करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली. तुम्ही प्रशासनाचा भाग आहात. तुमच्याकडेही जास्त शक्ती आहे. ते म्हणाले की, तुम्ही घेतलेले निर्णय हे राज्यकारभारात खूप महत्त्वाचे असतात.
तुम्हाला कोणतेही काम करायचे नसेल तर तुम्ही १०१ कारणे देऊ शकता. चांगले कृत्य करण्यासाठी एकच कारण पुरेसे आहे. त्यामुळे वेळीच निर्णय घेऊन चांगले प्रशासन देऊन सरकारचे नाव चांगले करा, असा सल्ला त्यांनी दिला.
काही समस्या असल्यास त्या तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून द्याव्यात व मार्गदर्शन घ्यावे. सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी आपले अनुभव मोकळेपणाने मांडावेत. त्यानंतर सरकार योग्य तो निर्णय घेऊ शकते, असे त्यांनी बैठकीच्या सुरुवातीलाच सांगितले.
अर्थसंकल्पाच्या अंमलबजावणीबाबत शासनाचे आदेश आहेत. तळागाळात त्यांच्या अंमलबजावणीसाठी पावले उचला असे सांगून वर्षअखेरीस उद्दिष्ट गाठण्याच्या सक्त सूचना त्यांनी दिल्या.
बैठकीत मंत्री आर. अशोक, जे. सी. मधुस्वामी, व्ही. सुनीलकुमार, सी. सी. पाटील, व्ही. सोमन्ना, बी. श्रीरामुलू, के. गोपलय्या, सरकारच्या मुख्य सचिव वंदिता शर्मा आणि सरकारचे इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta