बंगळूर : शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये एकाग्रता वाढवण्यासाठी, आरोग्य सुधारण्यासाठी आणि तणावमुक्त होण्यासाठी शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांना ध्यान करण्याचे आवाहन केले आहे. यापुढे शाळा-महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना १० मिनिटे ध्यान करण्याची मुभा देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे.
या संदर्भात शालेय शिक्षण मंत्री बी. सी. नागेश यांनी शालेय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांना पत्र लिहून ध्यानाबाबत आदेश जारी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शाळा आणि महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांनी दररोज १० मिनिटे ध्यान करणे आवश्यक आहे. यासाठी वेळ निश्चित करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.
या पत्राचा संदर्भ देत, मंत्री महोदयांनी त्यांच्या विभागाच्या प्रधान सचिवांना एक नोट दिली आहे आणि सर्व राज्यातील शाळा आणि पदवीपूर्व महाविद्यालयांमध्ये मुलांना ध्यानासाठी १० मिनिटांचा वेळ देऊन आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.
विभागाचे प्रधान सचिव या संदर्भात आदेश जारी करणार असून लवकरच शाळा, महाविद्यालयांमध्ये ध्यानधारणा करण्याचे आदेश अधिकृत होणार असल्याचे शिक्षणमंत्री नागेश यांनी सांगितले.
Belgaum Varta Belgaum Varta