बंगळूर : काँग्रेसचे माजी नेते एस. पी. मुद्देहनुमगौडा, अभिनेते-राजकारणी शशी कुमार आणि निवृत्त आयएएस अधिकारी अनिल कुमार बी. एच. यांनी गुरुवारी कर्नाटकातील सत्ताधारी भाजपमध्ये प्रवेश केला.
मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि प्रदेश भाजप अध्यक्ष नळीनकुमार कटील यांच्या उपस्थितीत येथील राज्य मुख्यालयात त्यांनी भाजपात प्रवेश केला.
वरिष्ठ नेते आणि तुमकुरुचे माजी खासदार मुद्देहनुमगौडा यांनी सप्टेंबरमध्ये काँग्रेस सोडण्याचा निर्णय जाहीर केला होता. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत तिकीट नाकारण्यात आलेले ते एकमेव काँग्रेसचे विद्यमान खासदार होते, कारण पक्षाने तुमकुरू जागा राज्यातील तत्कालीन आघाडीतील भागीदार धजदला दिली होती.
धजदचे सर्वेसर्वा व माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा हे तुमकुरू येथून काँग्रेस-धजद युतीचे संयुक्त उमेदवार होते.
या निर्णयामुळे संतापलेल्या मुद्देहनुमगौडा यांनी पक्षाचे उमेदवार आणि अपक्ष म्हणून अर्ज दाखल केले होते, परंतु शेवटी पक्षनेतृत्वाने त्यांना नकार दिला होता. मुद्देहनुमगौडा यांनी याआधीच कुनिगल मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवण्याचा इरादा व्यक्त केला आहे.
कन्नड चित्रपट अभिनेते शशी कुमार, पूर्वी काँग्रेस आणि धजद या दोन्ही पक्षांशी संबंधित होते. ते १३ व्या लोकसभेचे सदस्य होते, १९९९ मध्ये चित्रदुर्गातून जनता दल (युनायटेड) च्या तिकिटावर विजयी झाले होते. त्यांनी धजदच्या तिकिटावर २०१८ ची विधानसभा निवडणूक होसदुर्गा येथून अयशस्वीपणे लढवली होती.
जुलैमध्ये निवृत्तीच्या वेळी अनिल कुमार यांनी अतिरिक्त मुख्य सचिवपद भूषवले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एससी ‘डाव्या’ समुदायातील कुमार यांना तुमकुरू जिल्ह्यातील कोरटगेरे विधानसभा मतदारसंघातून तिकिटाची अपेक्षा आहे, ज्याचे सध्या काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी उपमुख्यमंत्री जी. परमेश्वर प्रतिनिधित्व करत आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta