पुरावे न्यायालयाकडे सादर करण्याचे निर्देश
बंगळूर : बेळगावच्या कंत्राटदार संतोष पाटील यांच्या आत्महत्येप्रकरणी भाजपचे माजी मंत्री के. एस. ईश्वरप्पा पुन्हा अडचणीत आले आहेत. याप्रकरणी सादर करण्यात आलेल्या बी अहवालाचे संपूर्ण पुरावे न्यायालयाकडे सोपवावेत, असा आदेश ४२ व्या विशेष न्यायालयाने दिला आहे. प्रकरणाची सुनावणी केल्यानंतर न्यायालयाने ३१ जानेवारीच्या आत सर्व पुरावे न्यायालयात सादर करण्याची सूचना केली आहे.
याआधी कंत्राटदार संतोष पाटील यांच्या कुटूंबियांनी बी अहवालावर प्रश्नचिन्ह उपस्थित करून न्यायालयात धाव घेतली होती. त्यावेळी उडुपी पोलिसांनी संपूर्ण कागदपत्रे सादर करण्यास विलंब का केला, असा सवाल करून पुन्हा न्यायालयात अर्ज केल्यानंतर न्यायालयाने नवा आदेश काढला.
माजी मंत्री ईश्वरप्पा यांच्या पीएला संतोष पाटील यांनी पैसे दिल्याचे व्हॉट्सअप मध्ये काही पुरावे समोर आले आहेत. ( कै. संतोष पाटील यांनी माजी मंत्री ईश्वरप्पा यांच्या पीएशी केलेल्या व्हॉट्सअप चॅटची प्रतही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
तांत्रिक पुरावा
संतोष पाटील यांच्या दोन मोबाईल फोनचा संपूर्ण डेटा आणि न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेतील सर्व तांत्रिक पुरावे देण्याचे आदेश न्ययालयाने दिले आहेत. संतोषचा मृतदेह ज्या हॉटेलमध्ये सापडला, त्या हॉटेलचे सीसीटीव्ही आणि पोलिसांनी तयार केलेला व्हिडीओ तपास अधिकाऱ्यांनी ३१ जानेवारीला स्वत: न्यायालयासमोर हजर होऊन सादर करावा असा आदेश देण्यात आला आहे. पोलिसांनी सादर केलेल्या बी अहवालावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या संतोष पाटील यांच्या भावाने याचिकेत खरा पुरावा लपवल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे पोलिसांसह साक्षीदार हजर झाल्यास सत्यता समोर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे संतोष पाटील यांचा भाऊ प्रशांत पाटील यांनी साक्षीदाराला न्यायालयात हजर करण्याची विनंती केली. प्रशांत पाटील यांच्यावतीने ऍड. के. बी. के. स्वामी यांनी युक्तिवाद केला.
बी अहवालातील संदर्भ
एफएसएलकडून ७० डेटा प्राप्त झाला आहे. मात्र पोलिसांनी चुकीची माहिती दिली. बी अहवालात केवळ ५५ हजार डेटा प्राप्त झाल्याचा उल्लेख आहे. त्यामुळे न्यायालयाने एफएसएलकडून हार्डडिस्क हजर करण्याचे निर्देश दिले आहेत. के. एस. ईश्वरप्पा यांच्यावर आरोप करणारे ठेकेदार संतोष पाटील यानी या सर्वांना कमिशन दिल्याचे संतोष यांच्या व्हॉट्सअप चॅटवरून उघड झाले आहे. हे काम करून घेतलेले ग्रामपंचायत अध्यक्ष नागेश मन्नोळकर यांच्याशी व्हॉट्सअप चॅट झाले आहे. ग्रामपंचायत अध्यक्षांशी झालेल्या चॅटचा उल्लेख पोलिसांनी न्यायालयात दिलेल्या बी अहवालात करण्यात आला आहे.
ईश्वरप्पा यांच्या पीएला २५ हजार रुपये दिल्याचे व्हॉट्सअपवर चॅट झाले आहे. बिल कमिशन म्हणून चार लाख १५ हजार दिल्याचा मेसेज करण्यात आला. संतोष पाटील यांच्यासोबत ईश्वरप्पा यांची भेट घेणाऱ्या महांतेश शास्त्री यांनी पोलिसांसमोर जबाब दिला. संतोष पाटील यांना कामाला लावण्यासाठी ईश्वरप्पा यांच्या पीएला कव्हर देण्यात आल्याचे महांतेश शास्त्री यांनी उडपी पोलिसांसमोर निवेदन केले आहे.