विजयपूर : विजयपूर जिल्ह्यात चडचाण तालुक्यातील हाविनाळ येथील इंडियन शुगर (श्री दत्त इंडिया) कंपनीचा गळीत हंगाम सन 2022-23 चालू होऊन 74 दिवस झाले असून कारखान्याचे आज अखेर 3 लाख 10 हजार मे.टन इतके गळीत झालेले आहे. कंपनीने गळीत हंगाम सन 2022-23 करिता ऊस दर 2255 रु प्रती मे. टन व अर्धा किलो टनेज साखर देण्याचे यापूर्वी जाहीर केले होते.
परंतु कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन श्री दत्त इंडिया कंपनीने आज अखेर गळीतास आलेल्या व येथून पुढे येणारा ऊसास वाढीव जादा ऊस दर 150 रुपये प्रती मे. टन देणार असल्याची घोषणा कंपनीचे उपाध्यक्ष मृत्युंजय शिंदे यांनी केली.
त्याचबरोबर 16 फेब्रुवारी 23 नंतर गळीतास येणाऱ्या ऊसास प्रती मे. टन 100 रुपये वेगळे जादा अनुदान पण देणार असून सदरचे कंपनीचे उपाध्यक्ष वाढीव ऊस बिल, अनुदान व टनेज साखरही हंगाम संपल्यानंतर देण्यात येणार असल्याचे उपाध्यक्ष मृत्युंजय शिंदे यांनी सांगितले. तसेच डिसेंबर अखेर ऊस बिले शेतकऱ्यांच्या खातेवर पूर्ण जमा केले असून व येथून पुढेही पूर्वी प्रमाणेच त्वरित शेतकऱ्यांच्या खातेवर ऊस बिल वर्ग करणार असल्याचे सांगितले, तरी कार्यक्षेत्रातील सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला असणारा सर्व ऊस गळीतास पाठवून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
यावेळी कंपनीचे संचालक चेतन धारू, जनरल मॅनेजर शरद मोरे, चिफ फायनान्स ऑफीसर अमोल शिंदे, केन मॅनेजर नवनाथ पाटील, शेती अधिकारी अनिरूध्द पाटील, शशिकांत घाडगे, प्रमोद पाटील, बाळासाहेब देवकते, ऊस उत्पादक शेतकरी व तोडणी-वाहतुक कंत्राटदार उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta