बेंगळुरू: कर्नाटक प्रदेश काँग्रेस समितीचे कार्यकारी अध्यक्ष आर ध्रुवनारायण यांचे आज शनिवारी (दि.११) म्हैसूर येथे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांना छातीत दुखू लागल्याने सकाळी ६.४० वाजता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण त्यांची प्राणज्योत मालवली, अशी माहिती डीआरएमएस हॉस्पिटलचे डॉक्टर मंजुनाथ यांनी दिली आहे.
आर ध्रुवनारायण हे चामराजनगर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार होते. ध्रुवनारायण यांना शनिवारी सकाळी हृदयविकाराचा झटका आला आणि म्हैसूर येथे त्यांचे निधन झाल्याचे सांगण्यात आले आहे. त्यांच्या निधनाबद्दल पुष्टी करताना केपीसीसीचे प्रवक्ते एम. लक्ष्मण यांनी सांगितले की ध्रुवनारायण शुक्रवारी बंगळूरहून परतले होते आणि शनिवारी पुन्हा ते बंगळूरला जाणार होते. आगामी निवडणुकीत म्हैसूरमधील नंजनगूड विधानसभा मतदारसंघातून त्यांना काँग्रेसकडून तिकीट दिले जाणार होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुलगे असा परिवार आहे.
विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या आणि केपीसीसीचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनीही आर ध्रुवनारायण यांच्या आकस्मिक निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. ध्रुवनारायण यांच्या निधनाबद्दल कर्नाटक काँग्रेसने दुःख व्यक्त केले आहे. प्रदेश काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार आणि केपीसीसीचे कार्याध्यक्ष ध्रुवनारायण यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ध्रुवनारायण यांच्या निधनाने काँग्रेस पक्षाची कधीही भरून न येणारी हानी झाली आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो. त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो, असे कर्नाटक काँग्रेसने ट्विट करत म्हटले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta