बंगळुरु : कर्नाटक उच्च न्यायालयाने अंतरिम जामीन अर्ज फेटाळल्यानंतर भाजपचे आमदार मदल विरुपक्षप्पा यांना लाच प्रकरणात अटक करण्यात आली आहे. भाजप आमदार मदल विरुपक्षप्पा यांना सोमवारी (दि. २७ मार्च) तुमाकुरू येथील क्याथासांद्र टोल प्लाझाजवळून अटक करण्यात आली.
भाजपचे आमदार मादल विरुपक्षप्पा यांचा मुलगा प्रशांत मदाल याला लोकायुक्त अधिकाऱ्यांनी २ मार्च रोजी एका कंत्राटदाराकडून ४० लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले होते. ही रक्कम तो वडिलांच्या वतीने केएसडीएल कार्यालयात घेत असल्याचा आरोप आहे.
प्रशांत मदल हे बेंगळुरू पाणीपुरवठा आणि मलनिस्सारण मंडळाचे मुख्य लेखा अधिकारी आहेत. मुलाच्या अटकेनंतर विरुपक्षप्पा यांनी केएसडीएल अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. हा कथित घोटाळा केएसडीएल मधील रसायनांच्या पुरवठ्याशी संबंधित आहे, ज्यामध्ये ८१ लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. विरुपक्षप्पा यांच्या घरातून ७ कोटींहून अधिक रुपयांची रोकडही जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आणखी चार जणांना अटक केली आहे.
मदल विरुपक्षप्पा हे दावणगिरी जिल्ह्यातील चन्नागिरी मतदारसंघातून सलग दोन वेळा आमदार आहेत. २०१८ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी प्रतिज्ञापत्रात ५.७३ कोटी रुपयांच्या संपत्तीचा खुलासा केला होता. २०१३ च्या निवडणुकीत त्यांनी १.७९ कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली होती.
कर्नाटकात या वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत. अशा स्थितीत लोकायुक्तांची कारवाई चर्चेचा विषय बनली आहे. भाजप आमदारावरील ही कारवाईही निवडणुकीचा मुद्दा बनली आहे. यावरून काँग्रेस आणि आप दोन्ही पक्ष भाजपवर हल्लाबोल करत आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta