इच्छुकांचे जोरदार लॉबिंग
बंगळूर : विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर होताच राज्यातील काँग्रेस, भाजप व धजद पक्ष आता उमेदवार निवडीच्या प्रक्रीयेला गती देत आहेत. यासाठी राजकीय पक्षांच्या हालचाली वाढल्या आहेत. उमेदवार निवड प्रक्रियेला वेग आला आहे. दरम्यान, ईच्छुक उमेदवारांनी जोरदार लॉबिंग सुरू केले असून राजकीय क्षेत्रात औत्सुक्य वाढले आहे.
कॉंग्रेस, भाजप व धजद या प्रमुख पक्षांचा सभा, मेळाव्यांचा धुमधडाका आता कांहीसा थंडावला आहे. सर्वच प्रमुख पक्षांनी आता उमेदवार निवडीवर लक्ष केंद्रीत केले आहे. काँग्रेस आणि धजदने यापूर्वीच आपली पहिली यादी जाहीर करून निवड प्रक्रीयेत आघाडी घेतली. विशेषता काँग्रेसच्या यादीतील मतदार संघांत इच्छुकांची संख्या अधिक व चुरस असल्याने निवड प्रक्रीयेत सावधानता बाळगली जात असल्याचे समजते. सर्वांना विश्वासात घेऊन सर्वमान्य उमेदवार निवडण्याचा प्रयत्न असल्याचे कॉंग्रेसच्या सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, सर्वच पक्षांच्या इच्छुक उमेदवारांनी आपल्या उमेदवारीसाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. कांहीनी बंगळूर व दिल्ली गाठली असून जोरदार लॉबिंग सुरू आहे.
गुजरात मॉडेलमुळे भाजपात चिंता
सत्ताधारी भाजप उमेदवार निवडीत पिछाडीवर आहे. पक्षाच्या उमेदवारांची निवड प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही. हायकमांड स्तरावर सर्व्हेक्षण झाले असले तरी उमेदवार निवडीबाबत नेत्यांच्या बैठका पूर्ण झालेल्या नाहीत. निवडणुकीची अंतिम मुदत जसजशी जवळ येत आहे, तसतशी भाजपमध्ये उमेदवार निवडीची प्रक्रिया जोर धरू पहात आहे, अनेक विद्यमान आमदारांना तिकीट गमवावे लागण्याची भीती निर्माण झाली असून, त्यांच्यासमोर एक प्रकारचा पेच निर्माण झाला आहे.
उमेदवार निवडताना भाजप गुजरात पॅटर्नचा अवलंब करेल. त्यानुसार यावेळी अनेक विद्यमान आमदारांना तिकीट गमवावे लागेल. नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात येणार असल्याची चर्चा आहे, त्यामुळे भाजपच्या अनेक आमदारांत तिकीट मिळणार की नाही, अशी चिंता निर्माण झाली आहे.
विजयासाठीचे निकष आणि सर्वेक्षण अहवालाच्या आधारे भाजप उमेदवारांची निवड करेल, असे सूत्रांनी सांगितले. संभाव्य उमेदवारांची यादी आधीच तयार करण्यात आली आहे. यादी अंतिम करण्याची कसरत आजपासून सुरू झाली असून, उमेदवार निवडीवर चर्चा करण्यासाठी महत्त्वाच्या नेत्यांची बैठक होणार असल्याचे समजते. ही यादी पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीकडे मंजुरीसाठी पाठवली जाणार आहे. या सगळ्याला ४-५ दिवस लागतील.
केंद्रीय निवडणूक समितीच्या मान्यतेनंतर भाजपच्या उमेदवारांची यादी दहा एप्रीलपर्यंत जाहीर होण्याची शक्यता असल्याचे सांगितले जाते.
भाजपच्या विद्यमान आमदारांपैकी किती जणाना आणि कोणाला तिकीट मिळणार, हे उत्सुकतेचे ठरले आहे. तिकीट गमावण्याची भीती असलेल्या काही आमदारांनी पक्षातील गॉडफादरच्या माध्यमातून तिकीट मिळविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू केले आहेत.
दुसऱ्या यादीसाठी काँग्रेसची आज बैठक
काँग्रेस पक्षाने १२४ उमेदवारांची पहिली यादी यापूर्वीच जाहीर केली असून दुसऱ्या यादीसाठी निवड प्रक्रियेलाही वेग आला आहे. आज काँग्रेस पक्षाच्या स्क्रीनिंग कमिटीची बैठक होत आहे. या बैठकीत उर्वरित मतदारसंघातील उमेदवारांची यादी तयार करून ती हायकमांडकडे मंजुरीसाठी पाठवली जाईल. काँग्रेसची दुसरी यादी दहा एप्रीलनंतर जाहीर होण्याची शक्यता आहे.
अत्यंत स्पर्धात्मक मतदारसंघात उमेदवारांची निवड वरिष्ठांवर सोडण्याबरोबरच, संभाव्य बंडखोरी टाळण्यासाठी काँग्रेसने काही नेत्यांचे मन वळवण्याचाही प्रयत्न केला आहे. पक्षातील सूत्रांनी सांगितले की, गोंधळ आणि बंडखोरी टाळण्यासाठी काँग्रेसने उमेदवार निवडीवर लक्ष केंद्रित केले आहे.
स्क्रीनिंग समितीचे अध्यक्ष मोहन प्रकाश यांच्या अध्यक्षतेखाली आज होणाऱ्या बैठकीत केपीसीसी अध्यक्ष डी. के. शिवकुमार, विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या, बी. के. हरिप्रसाद, काँग्रेसचे प्रभारी रणदीपसिंग सुरजेवाला, प्रचार समितीचे अध्यक्ष एम. बी. पाटील उपस्थित राहणार आहेत.
धजदची दुसरी यादी लवकरच
काँग्रेस-भाजपच्या आधी उमेदवारांची पहिली यादी जाहीर करून धजदने आघाडी घेतली होती. निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच उमेदवारांची दुसरी यादी तयार करण्याकडे धजद पक्षाने लक्ष वेधले असून लवकरच चर्चा करून दुसरी यादी जाहीर करणार आहे. धजदने पहिल्या टप्प्यात ९३ उमेदवारांची यादी जाहीर केली होती.
आम आदमी पक्षाने (आप) प्रथमच कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे निवडणुकीत चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे. आपने सर्व २२४ जागांवर उमेदवार उभे करण्याची घोषणा केली असली तरी या पक्षांचीही उमेदवार यादी अजून जाहीर झालेली नाही.
Belgaum Varta Belgaum Varta