रामनगर : धर्मनिरपेक्ष जनता दलाचे प्रमुख एच. डी. देवेगौडा यांची सून भवानी रेवण्णा कर्नाटक विधानसभा निवडणुकीत हासन मतदारसंघातून निवडणूक लढण्यावर ठाम आहे. यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना पक्षाचे नेते नेते एच. डी. कुमारस्वामी यांनी सोमवारी स्पष्ट केले, की हासन मतदारसंघाच्या उमेदवार निवडीबाबत आपल्या भूमिकेत कोणताही बदल झालेला नाही. आपले वडील आणि पक्षप्रमुख देवेगौडा याबाबत अंतिम निर्णय घेतील. यावरून देवेगौडा यांच्या कुटुंबात मतभेद निर्माण झाल्याची चिन्हे दिसत आहेत.
भवानी रेवण्णा या कुमारस्वामी यांचे मोठे बंधू आणि माजी मंत्री एच. डी. रेवण्णा यांच्या पत्नी आहेत. त्या हसन जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या आहेत. या उमेदवारीसाठी त्यांना त्यांच्या पतीसह खासदार प्रज्ज्वल आणि विधान परिषद आमदार सूरज रेवण्णा या मुलांनी खंबीर पाठिंबा दिला आहे. मात्र, कुमारस्वामी यांनी हासन येथील जागेवर पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांस उमेदवारी दिली जाईल, असे वारंवार स्पष्ट केले आहे. माजी पंतप्रधान व पक्षप्रमुख एच. डी. देवेगौडा प्रकृती अस्वास्थ्यामुळे राजकारणात सक्रिय नसले तरी त्यांनी रविवारी आपले दोन पुत्र व भवानी यांच्याबरोबर चर्चा केली. मात्र, या चर्चेतून ही कोंडी फुटू शकली नाही, असे दिसत आहे. कुमारस्वामी यांनी सांगितले, की कालच्या चर्चेत अनेक मुद्दय़ांवर चर्चा झाली. या मुद्दय़ावरही समंजसपणे निर्णय घेतला जाईल. देवेगौडा आज दिल्लीला गेले आहेत. ते परतल्यानंतर हासनच्या उमेदवारीबाबत अंतिम निर्णय होईल. याबाबत माझ्या भूमिकेत कोणताही बदल होणार नाही, हे मी आधीच स्पष्ट केले आहे.
मुख्यमंत्री बोम्मई शिग्गांवमधून रिंगणात
बंगळूरु : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी हावेरी जिल्ह्यातील शिग्गांव मतदारसंघातून पुन्हा निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले. राज्य सरकारच्या बाजूने लाट असल्याचा दावा बोम्मई यांनी केला आहे. भ्रष्टाचाराच्या मुद्दय़ावर काँग्रेसला टीका करण्याचा अधिकार नाही. केंद्रात संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार असताना त्यांच्या कारभाराने देशाच्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम झाला याचा विचार करा, असा टोला त्यांनी काँग्रेसला लगावला.
भाजप आमदार काँग्रेसमध्ये
भाजपचे कुडलिगी येथील आमदार एन. वाय. गोपालकृष्ण यांनी सोमवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. भाजप तसेच धर्मनिरपेक्ष जनता दलाचे अनेक नेते काँग्रेसमध्ये येण्यास उत्सुक असल्याचा दावा त्यांनी केला.
Belgaum Varta Belgaum Varta