बंगळूर : सोमवारी दहावी (एसएसएलसी) परीक्षेदरम्यान सामूहिक कॉपी करण्यास परवानगी दिल्याबद्दल गुलबर्गा जिल्ह्यातील अफझलपूर तालुक्यातील गोब्बूर सरकारी शाळेतील मुख्याध्यापक आणि १६ सहाय्यक शिक्षकांना सार्वजनिक शिक्षणाच्या अतिरिक्त आयुक्तांनी निलंबित केले आहे.
निलंबनाच्या आदेशात, सार्वजनिक शिक्षण विभागाचे अतिरिक्त आयुक्त आनंद प्रकाश मीणा यांनी म्हटले आहे की, ड्युटीवर असलेले परीक्षा कर्मचारी, पर्यवेक्षक आणि निरीक्षकांनी गणिताच्या परीक्षेदरम्यान गैरप्रकार होऊ देण्यासाठी नियमांचे उल्लंघन केले आहे.
परीक्षा केंद्राला अचानक भेट देऊन परीक्षार्थी शाळेच्या आवारात मोकळ्या मैदानात परीक्षा देत असल्याचे पोलीस अधीक्षक ईशा पंत यांनी सादर केलेल्या अहवालाच्या आधारे निलंबनाचा आदेश जारी करण्यात आला.
निलंबित केलेले शिक्षक
गोब्बूर शाळेचे मुख्याध्यापक गोल्लालप्पा, शिक्षक/अभिरक्षक भीमा शंकर आणि अरुणा कुमार, बिदनूर शाळेचे शिक्षक रवींद्र, बंदरवाडा सरकारी शाळेतील शिक्षक देवेंद्रप्पा यारगल, सविताबाई जमादार, कोगनूर मोरारजी निवासी शाळेचे शिक्षक नागाप्पा, विद्यालयाचे शिक्षक चौदापूर, कित्तूरराणी चन्नम्मा शाळेच्या शिक्षिका परवीन सुलताना, हवनूर शाळेच्या शिक्षिका बाबू पवार, हसरगुंडगी शाळेतील कविता डी., गायत्री बिरादार, बिदनूर माध्यमिक विद्यालयच्या जयश्री शेरी, विद्यावती, मीनाक्षी दुधनीकर या सर्वांना सेवेतून निलंबित करण्याचा आदेश शालेय शिक्षण उपायुक्तांनी जारी केला आहे.
झेरॉक्स, गाईड, पुस्तकांचा ढीग
गोब्बूर जिल्हा पोलीस अधीक्षक ईशा पंत परीक्षा केंद्रातील स्वच्छता आदी व्यवस्था तपासण्यासाठी गेल्या असता त्यांना अनेक जण परीक्षा केंद्राच्या परिसरात फिरत असल्याचे निदर्शनास आले. मनाई आदेश असूनही त्याचे पालन केले जात नव्हते. परीक्षा केंद्राच्या आजूबाजूला झेरॉक्सच्या प्रती, वह्या व मायक्रो झेरॉक्स शीट्सचा ढीग आढळून आला. केंद्राच्या आत मोठ्या प्रमाणात कॉपी होत असल्याची माहिती मिळाली.
या अहवालाच्या आधारे, आयुक्तांनी अफझलपूर गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून सविस्तर अहवाल मागितला. त्यानुसार गटशिक्षणाधिकाऱ्यांनी शालेय शिक्षण विभागाच्या अतिरिक्त आयुक्तांना सामूहिक कॉपीचे अनेक पुरावे आढळून आल्याचा अहवालही सादर केला. जिल्हा एसपी ईशा पंत आणि अफझलपूरचे गटशिक्षणाधिकारी मारुती हुजुराती यांच्या अहवालाच्या आधारे शालेय शिक्षण विभागाचे उपायुक्त आनंद प्रकाश मीना यांनी परीक्षा केंद्रावर कर्तव्यावर असलेले परीक्षा पर्यवेक्षक, संरक्षक, निरीक्षक यांच्यासह १६ शिक्षकांना निलंबित केले.
Belgaum Varta Belgaum Varta