बेंगळुरु : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या यांचे कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी नाव जवळपास निश्चित झाले आहे. परंतु अशी कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. यापूर्वीच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मुख्यमंत्रीपदाचे मुख्य दावेदार सिद्धरामय्या यांच्या समर्थकांनी कर्नाकमध्ये फटाके फोडून, जल्लोष करण्यास सुरूवात केली आहे.
उद्या (दि.१८) गुरुवारी कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदाचा शपथविधी होणार आहे. दरम्यान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या हे एकटेच शपथ घेणार असल्याची शक्यता आहे. मुख्यमंत्रीपदाचे आणखी एक दावेदार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांना नवीन सरकारमध्ये महत्त्वपूर्ण कॅबिनेट खात्यांसह उपमुख्यमंत्री पदाची ऑफर देण्यात आली आहे. उद्या दुपारच्या जेवणानंतर हा शपथविधी सोहळा होण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला १३५ जागेसह पूर्ण बहुमत मिळाले आहे. यानंतर मुख्यमंत्रीपदाची धुरा कोणाच्या हाती येणार याकडे संपूर्ण कर्नाटकसह देशाचे लक्ष लागले आहे. दरम्यान कर्नाटक माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशामध्यक्ष डी. के. शिवकुमार यांच्यात मुख्यमंत्रीपदासाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे. पक्ष निरीक्षकांनी दिलेल्या अहवालानंतरही आज दिवसभर काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह, राहुल गांधी आणि इतर पक्षश्रेष्ठींमध्ये कर्नाटक मुख्यमंत्री पदावरून चर्चा सुरूच आहे. अद्याप यासंदर्भात पक्षाकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.